Mon, Nov 19, 2018 23:44होमपेज › Pune › पोलिसांनी जुळवल्या रेशीमगाठी...

पोलिसांनी जुळवल्या रेशीमगाठी...

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:09AMपुणे/बिबवेवाडी : प्रतिनिधी

विवाह म्हणजे दोन जिवांचे मीलन... नवीन आयुष्याला सुरुवात... त्यातही   प्रेमविवाह असेल ‘थ्रील’च... विवाह कार्यात वधू-वरासह आप्तेष्ठांच्या मानपानालाही महत्त्व असते... तो योग्यरीत्या राखला गेला नाही तर रुसवे-फुगवे ठरलेलेच मग, एकमेकांची मनधरणी करून विवाह सोहळा उरकला जातो. असं  काहीसं चित्र विवाह सोहळ्यात पाहायला मिळतं. मात्र, पुण्यातल्या एका लग्नसोहळ्याची गोष्टच अनोखी आहे. 

मानपानावरून लग्न मोडले आणि त्याची तक्रार थेट पोलिसांत करण्यात आली. पोलिस म्हटलं की, भानगडी वाढण्याची शक्यता... पण, झालं उलट. पुणे पोलिसांनी मानपानामुळे मोडलेले लग्न वधू-वर पक्षांकडील नातेवाईकांची समजूत काढत पुन्हा जुळवले आणि दोन्ही कुटुंबाला एकत्र आणत पुन्हा लग्नाच्या गाठी जुळवून आणल्या. पुण्यातील बिबवेवाडी भागातील विवाह सोहळ्याची ही अनोखी गोष्ट आहे. बंटी आणि बबली (नावे बदललेली आहेत) तीन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. या काळात ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दोन्ही कुटुंबांकडून त्यांच्या या निर्णयाला नकार मिळाला. आधीच आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.  त्यामुळे या जोडप्याने शक्कल लढवत विवाहापूर्वी संबंध आल्याचे आपापल्या पालकांना सांगितले आणि विवाहाला परवानगी मिळविली. त्यानंतर लगोलगच नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला आणि दोन्ही कुटुंबात विवाह कार्याच्या तयारीलाही जोरदार सुरुवात झाली. घरात लग्नकार्य म्हटल्यानंतर कपडे, सोने खरेदी आलीच. ते सर्व उरकून  लग्नपत्रिकाही वाटल्या. 


आता दोन्हीकडे लगीनघाई सुरू झाली होती. लग्नघटिका  समीप म्हणजे दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच वधूच्या साडीवरून वाद झाला. क्षुल्लक कारण असताना वराकडून टोकाची भूमिका घेत थेट लग्न मोडल्याचेच जाहीर केले गेेले. त्यामुळे वधू पक्षाकडील लोक हादरून गेले. इकडे प्रेमात आकंट बुडालेल्या बंटीने अचानक यू टर्न घेत बबलीकडे पाठ फिरवली. या प्रकाराने संतापलेल्या बंटीने न्यायासाठी थेट पोलिस आयुक्तालय गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत तेथे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांपर्यर्ंत हे प्रकरण गेले. मग, त्यांनी  वराचे पालक आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलावून समजूत काढली.  दोन्ही कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसविले. लग्न मोडल्यास बंटी-बबलीच्या पुढील आयुष्याचे काय? यासारखे  भावनिक प्रश्‍न उपस्थित करून विवाहाला दिलेला नकार अखेर होकारात बदलवला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी याच दिवशी अखेर पोलिसांच्या साक्षीने या बंटी-बबलीचा  विवाहसोहळा थाटात पार पडला. केवळ साडीवरून तुटलेल्या रेशीमगाठी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढल्याने जुळून आल्या.