होमपेज › Pune › पेपर फोडणार्‍या दोन हॅकर्सना पोलिस कोठडी

पेपर फोडणार्‍या दोन हॅकर्सना पोलिस कोठडी

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:49AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसवाय बीएस्सी या वर्षाच्या ‘लिनिअर अल्जिब्रा’ या विषयाचा पेपर फोडणार्‍या दोन हॅकर्सना सायबर क्राईमच्या पोलिसांनी अटक केली. हे दोघेही के. के. वाघ इंजीनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. 

विद्यापीठाच्या व्दितीय वर्ष विज्ञान शाखेचा ‘लिनीअर अल्जिब्रा’ हा पेपर 28 एप्रिल 2018 रोजी होता. या पेपरच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 एप्रिलच्या मध्यरात्रीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. प्रकरणाचे गांभिर्य ओळखून विद्यापीठाने तातडीने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीमध्ये केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. ए. व्ही. पाटील आणि डॉ. राजेश तलवारे यांचा समावेश होता. समितीने घटनेनंतर नाशिकमध्ये सखोल चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या हाती काही धागेदोरे लागले. त्यानुसार समितीचे सदस्य या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांनी www.unipune.ac.inहे संकेतस्थळ कशाप्रकारे हॅक केले आणि पेपर फोडला याचा तपशील लेखी स्वरूपात दिला. त्यानंतर विद्यापीठाच्या वतीने उपकेंद्रातील कनिष्ठ सहाय्यक योगेश सोनार यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना अटक केली आहे. 

विद्यापीठाच्या बीएससी द्वितीय वर्षाची ’लिनिअर अल्जेब्रा’ या विषयाची प्रश्नपत्रिका नाशिकमध्ये फुटल्याचे वृत्त 28 एप्रिल रोजी माध्यमांमध्ये देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कुलगुरुंच्या आदेशानुसार डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एकूण तीन सदस्यीय समितीकडून चौकशी करण्यात आली. त्यात दोन व्यक्ती या प्रकरणी जबाबदार असल्याचे आढळून आले. ही पेपरफुटी इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून करण्यात आल्याने या प्रकरणी नाशिक येथे सायबर गुन्हेशाखे’कडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी आता सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे.