Tue, Apr 23, 2019 02:29होमपेज › Pune › पोलिस आयुक्‍तालय साधणार 15 ऑगस्टचा मुहूर्त?

पोलिस आयुक्‍तालय साधणार 15 ऑगस्टचा मुहूर्त?

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:13AMपिंपरी : संतोष शिंदे

शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येत्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयुक्तालय सुरू होणार अशी चर्चा सुरू आहे, मात्र आयुक्तालयासाठी लागणार्‍या पायाभूत गोष्टींची पूर्तता अद्याप झाली नाही. त्यामुळे येत्या पंधरा ऑगस्टला आयुक्तालयाचा मुहूर्त साधणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘पुढारी’ने आयुक्तालयाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून केलेला हा सविस्तर वृत्तांत.

मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय देण्याची ग्वाही दिल्यानंतर पोलिस आणि महापालिका अधिकार्‍यांनी जागांची पाहणी केली. चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले इंग्रजी माध्यमाची शाळा आयुक्तालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येत्या पंधरा ऑगस्टला या ठिकाणी आयुक्तालय होणार अशी ग्वाही राजकीय मंडळींनी दिली; मात्र आयुक्तालय सुरु करण्यासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा अद्याप पुरवण्यात आल्या नाहीत.

बुधवारी (दि.11) चिंचवड प्रेमलोकपार्क येथील महात्मा फुले शाळेतील कामाची पाहणी केली असता.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावल्याचे आढळून आले. या शाळेची रंगरंगोटी देखील अद्याप पूर्ण झाली नाही. शाळेत प्रवेश केल्यानंतर केवळ दोन रंगारी काम करीत असल्याचे पहावयास मिळाले. शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये राडारोडा अजूनही तसाच पडून आहे. खिडक्यांची दारे आणि काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. शाळेच्या आवारात गवत वाढले असून, राडारोडा पडलेला आहे. 

निगडीतील अंकुश कोंडीबा बोर्‍हाडे विद्यालयाची इमारत देखील आयुक्तालयाच्या इतर कामासाठी देण्यात येणार आहे; मात्र या ठिकाणी अजूनही शाळा भरते. या इमारतीची पाहणी केल्यानंतर येत्या महिन्याभरात शहरात आयुक्तालय सुरु होणार, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

फर्निचरचे टेंडर निघालेच नाही 

आयुक्तालयासाठी देण्यात येणार्‍या इमारतीचे भाडे अद्याप निश्चित झाले नाही; तसेच महापालिका फर्निचर तयार करून इमारत ताब्यात देणार आहे; मात्र या फर्निचरसाठी अद्याप टेंडरच निघाले नाही. हे टेंडर निघण्यास अजून आठवडाभराचा अवधी जाणार असून, प्रत्यक्षात फर्निचरचे काम सुरू होण्यास दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागू शकतो.