Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Pune › शहर भिक्षेकरीमुक्‍त करण्यासाठी पोलिस आयुक्‍त सरसावले

शहर भिक्षेकरीमुक्‍त करण्यासाठी पोलिस आयुक्‍त सरसावले

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये भिकार्‍यांचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे चित्र पहावयास मिळते. अपंग, लहान मुले, मुले कडेवर घेऊन भीक मागणार्‍या महिला चौकाचौकात पहावयास मिळतात. यापूर्वीही  पुणे भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी पोलिस, महापालिका व बालकल्याण विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, तो केवळ फार्स ठरल्याने चौकाचौकात भिक्षेकरी दिसून येत आहेत. अशा भिक्षेकर्‍यांवर पुणे पोलिस कारवाई करण्याच्या पावित्र्यात आहेत. पोलिस ठाण्यांनी यासंदर्भात आपापल्या  हद्दीतील भिक्षेकर्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचा अ‍ॅक्शन प्लॅनही तयार करण्यात येत आहे. मात्र, या भिक्षेकर्‍यांना भीक मागण्यास भाग पाडणार्‍यांचे रॅकेटही उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. 

पुणे शहर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळेे शहरात रोजगारासाठी दाखल होणार्‍यांसोबतच पुणे शहरात रस्त्यारस्त्यांवर भिक्षा मागणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना माफियांकडून दरदिवशी ‘टार्गेट’ दिले जाते. ते पुर्ण न केल्यास त्यांना मारहाण केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या लुळ्या पांगळ्या भिकार्यांना औरंगाबाद, नागपूर, पंढरपूर, नवी मुंबई येथूनच नव्हे तर युपी, बिहार या राज्यातूनही तेथील माफियांना 15 हजार रुपये देउन खरेदी केल्याची बाब मागील काही महिन्यांपुर्वी दैनिक पुढारी ने उघडकिस आणली होती. पुण्यात असे जवळपास दीडशे ते 200 भिकार्यांना या माफियांनी आणले असून त्यांना वर्दळीच्या चौकात भिक मागायला लावले जाते. पुणेकरांच्या दजेमायेवर भिक्षेकर्‍यांना पैसे मिळतात. परंतु या माध्यमातून केवळ अन केवळ फक्त ‘माफियां’च्याच तुंबड्या भरल्या जात आहेत. महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असून ती थेट माफियांच्या घशात जाते. हा प्रकार दैनिक पुढारीने मे महिन्यात उघड केला होता. 

कोंढवा पोलिस ठाण्याचा परिसर भिक्षेकरी मुक्त 

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी मागील वर्षी  कौसरबाग, कमिला मज्जीद, लुल्लानगर चौक आदी परिसरातून भिक्षेकर्‍यांना ताब्यात घेत मुंबई भिक्षा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत  कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान तब्बल 105 भिक्षेकर्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. कोंढवा पोलिस ठाणे हद्द ही पुर्णपणे भिक्षेकरी मुक्त करण्यात आली आहे.  मात्र शहरातील इतर पोलिस ठाण्यांच्या परिसरात भिक्षेकरी मोकटपणे भिक्षा मागताना दिसत आहेत. 

पुणे भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी  मे महिन्यात पोलिस, महापालिका व बालकल्याण विभागाकडून मोहिम हाती घेण्यात आली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांनी यासंदर्भात आदेशही दिले होते. मात्र तरीही पुण्याच्या चौकाचौकात भिक्षेकरी दिसत आहेत. त्यामुळे पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना हद्दीतील भिक्षेकर्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठीचा अ‍ॅक़्शन प्लॅनही तयार करण्यात येत आहे. मात्र यासोबतच भिक्षेकर्‍यांचे रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त होतील का? हा प्रश्‍न पुणेकरांना आहे. 

कडेवर मूल असले की भीक जास्त मिळते

कडेवर मुल असले की भिक जास्त मिळते. यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 18 ऑगस्ट रोजी भिक मागण्यासाठी एका महिलेने चार महिन्यांचे एका महिलेचे मुल पळवून नेले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी महिलेला मुलासह भिक्षा मागत असताना मुंबई येथून तिला अटक करण्यात आली होती. पुणे रेल्वे स्थानकातून मागील काही महिन्यात तेथे राहणार्‍यांची मुलं पळवून नेल्याच्या आतापर्यंत चार घटना घडल्या आहेत. या घटनांमधून मुलं पळविणारं रॅकेटही असल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतु  यामागे सक्रिय असणारे रॅकेटही उध्वस्त करणे गरजेचे आहे.