Mon, Apr 22, 2019 16:06होमपेज › Pune › दहावीतील विद्यार्थ्याचा एकतर्फी प्रेमातून खून 

दहावीतील विद्यार्थ्याचा एकतर्फी प्रेमातून खून 

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 12:53AMपिंपरी : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेम असणार्‍या दहावीतील मुलीसोबत रात्री फिरताना दिसल्याने चिडून एकाने दहावीतील पंधरा वर्षांच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना निगडी येथील पूर्णानगरमध्ये सोमवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.वेदांत जयवंत भोसले (15, रा. पूर्णानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर रोहन प्रदीप महाळगीकर (18, रा. पूर्णानगर, चिंचवड) याला अटक झाली आहे. वेदांतची आई जान्हवी (40) यांनी फिर्याद दिली आहे.

वेदांत हा निगडीतील अमृता विद्यालयात दहावीत होता. सध्या दहावीची परीक्षा असल्याचे रात्री उशिरापर्यंत तो अभ्यास करत होता. वर्गातील त्याची मैत्रीण वेदांतकडे अभ्यासाला येत होती. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या रोहनचे वेदांतसोबत अभ्यास करणार्‍या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याच्या मनात या दोघांविषयी शंका होती.

सोमवारी रात्रीही वेदांतच्या घरी त्याची मैत्रीण अभ्यासाला आली होती. अभ्यास झाल्यानंतर वेदांत तिला सोडण्यासाठी तिच्या घरी गेला. तिला सोडून परत येत असताना रोहनने त्याला थांबवले. मला जवळ सोडून ये, असे सांगून त्याला थोडे बाजूला नेले. बाजूला गेल्यानंतर चाकूने वेदांतला भोसकले. त्यानंतर त्याचा गळा चिरला आणि शरीरावर निर्घृणपणे वार केले. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून रोहन तेथून पळून गेला. दरम्यान, बराच वेळ होऊनही मुलगा रोहन परत आला नसल्याने आई जान्हवी त्याला पाहण्यासाठी बाहेर आली. वेदांतच्या मैत्रिणीच्या घराकडे जात असताना मोरया क्‍लासिक इमारतीच्या पायर्‍यांवर वेदांत जखमी आवस्थेत आढळला.

परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

दरम्यान, तपास पथकातील पोलिस कर्मचारी संदीप पाटील आणि विलास केकाण यांना आरोपीची माहिती खबर्‍यामार्फत मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक पळसुले, शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, योगेश आव्हाड, उपनिरीक्षक विवेक वल्टे, तात्या तापकीर, बाबा चव्हाण, किरण खेडकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून रोहनला ताब्यात घेतले. रोहनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपास निगडी पोलिस करत आहेत.