Fri, Apr 26, 2019 15:35होमपेज › Pune › छत्तीस बांगलादेशींना पोलिसांनी पकडले

छत्तीस बांगलादेशींना पोलिसांनी पकडले

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीसी) जिल्ह्यातील पाच गावांमध्ये, बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या तब्बल 36 बांगलादेशींना पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र, इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. ते गावातील बौद्ध विहारात राहत होते. या बांगलादेशींकडे चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिसांनी दिली. 

यवत, दौंड व बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव, पाटस, कुरकुंभ, मोरगाव, लासुर्णे येथे ही कारवाई केली आहे. एटीसी आणि स्थानिक पोलिस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे दहशतविरोधी पथकाने (एटीसी) अन्नार उल बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील तिघांना अटक केली होती. त्यातच आता जिल्ह्यातही बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या बांगलादेशींना पकडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामीण पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी यवत, बारामती ग्रामीण, दौड, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रे बनविणे तसेच, बेकायदेशीरपणे भारतात राहणे, या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापयर्र्ंत सुरू होते.  या बांग्लादेशी नागरिकांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी 3 सह 6 पारपत्र (भारतामध्ये प्रवेश) नियम 1955 सह परिच्छेद 3 (1) परकीय नागरिक आदेश 1948 सह कलम 14 परकीय नागरिक कायदा 1946 तसेच भा.दं.वि. का.क. 465,467,471,34 अन्वये संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे, असे जिल्हा पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अर्जुन मोहिते, उपनिरीक्षक एस. व्ही. ठगारे व पथक, तसेच बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. आर. गौड, उपनिरीक्षक सी. बी. बेरड, हवालदार जयंत ताकवणे, राजेंद्र शेंडगे, शरद वारे यांनी शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी रात्रीपयर्र्ंत जिल्ह्यात ही कारवाई करत बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या 35 बांगलादेशींना पकडले आहे. 

जिल्हा पोलिस दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी मध्यरात्री दौंड तालुक्यातील पाटस गावात असणार्‍या बौद्ध विहारातून 15 बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते गेल्या एक ते दीड वषार्र्ंपासून बेकायदेशीररीत्या तेथे रहात असल्याचे समोर आले आहे. यातील काहीजण प्रथम या ठिकाणी आले. त्यानंतर या बांगलादेशींची संख्या वाढत गेली. काही दिवस गावी जाण्यासाठी म्हणून ते निघून जात. त्यानंतर दुसरे बांगलादेशी येथे येत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

माळेगावमधून 12 जण ताब्यात

बारामती तालुक्यातील माळेगाव गावातून बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र तसेच इतर कागदपत्रे तयार करण्यात आले आहेत. माळेगाव येथील बुद्ध विहारात ते राहात होते. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. माळेगावात एकूण 12 जण होते. त्यातील नऊ जण पोलिसांच्या हाती लागले. तिघांनी तेथून पळ काढला. परंतु पोलिसांनी त्यांचा शोध घेत दौंड रेल्वे स्थानक परिसरात त्यांना पकडले. कुरंकुभ बौद्ध विहारातून दोन लोकांना ताब्यात घेतले. यातील काहींकडे मिळालेले पासपोर्ट बनावट आहेत. तर, काहीचे पासपोर्टची मुदत संपली आहे. त्यांच्याकडे आधारकार्ड तसेच इतर कागदपत्रे असून, त्यांनी हे कोठून मिळवली, याबाबत तपास सुरू आहे.  कारवाईत पोलिसांनी एकूण 36 जणांना पकडले असून, त्यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, याबाबतचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही. 

दोन महिन्यांपूर्वीच ‘एबीटी’चे तिघेजण ताब्यात

पुणे दहशतवादविरोधी पथकाने दोन महिन्यांपूर्वीच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून अन्नार उल बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेचे हस्तक असल्याच्या संशयावरून तीन बांगलादेशींना अटक केली होती. त्यानंतर या माहितीवरून एसीबीने अंबरनाथ आणि महाड येथून दोघांना अटक केली होती. ,या घटनेनंतर शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. तिघेही शहरात बनावट कागदपत्र तयार करून वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र, आयडी कार्ड तसेच इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, एबीटी ही संघटना बंदी असलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील संघटना म्हणून ओळखी जाते. त्यानंतर घुसखोरी करून भारतात प्रवेश करणार्‍या बांगलादेशी तसेच इतर देशांतील नागरिकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.