Tue, Mar 19, 2019 11:20होमपेज › Pune › पोलिसांना शिवीगाळ, धमकी

पोलिसांना शिवीगाळ, धमकी

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 23 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी 

भरधाव वेगात कार चालविणार्‍याला थांबवून सिट बेल्ट लावला नसल्याने व काळ्या फिल्मींग केल्याने चलन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून कारचालक तरुणाने पोलिस कर्मचार्‍यावर हात उगारून त्यांना धमकी दिली. ही घटना शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास कोथरुड येथे घडली. 

याप्रकरणी तरुणावर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश गजेंद्र गागडे (27, ए. आर. ए. आय. चंद्रभागा क्लिनकजवळ, केळेवाडी, कोथरुड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निखील कुर्‍हे (पोलिस कॉन्स्टेबल, कोथरुड वाहतूक विभाग) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील कुर्‍हे हे कोथरुड वाहतूक विभागात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ते शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास वाहनांवर कारवाई करण्यासाठी कोथरुड वाहतूक विभागासमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभे होते. त्यावेळी आकाश गागडे हा त्याची कार सीट बेल्ट न लावता भरधाव वेगात तेथून घेऊन जात होता. त्याला कुर्‍हे यांनी थांबविले त्यावेळी त्याच्या कारला काळ्या काचा (ब्लॅक फिल्मींग) लावलेल्या दिसल्या.

त्यामुळे त्यांनी त्याला त्याबाबत कायदेशीर ई-चलन करण्यास सांगितले. त्यावेळी त्याला चलन करण्यास सांगितल्याचा राग आल्याने तो मारण्यासाठी कुर्‍हे यांच्यावर हात उगारून मारण्यासाठी धावून गेला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत वरिष्ठांनाही तुम्हाला काय करायचे आहे ते करा, अशी धमकी दिली. पुढील तपास कोथरुड पोलिस करत आहेत.