Sun, Aug 25, 2019 08:01होमपेज › Pune › पोलिस आयुक्तालय महाराष्ट्रदिनी होणार सुरू?

पोलिस आयुक्तालय महाराष्ट्रदिनी होणार सुरू?

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 12:01AMपिंपरी : अमोल येलमार

वीस ते बावीस लाखांची लोकसंख्या असलेले शहर, भरदिवसा घडणारे गंभीर गुन्हे आणि सुरक्षेसाठी असलेले जमतेम दीड हजार पोलिस. झपाट्याने वाढलेल्या या पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी फोफावली आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नुसतीच चर्चा, प्रस्ताव सुरू असलेले पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक वेळा अधिवेशनात मंजुरी मिळेल, 26 जानेवारीला घोषणा होईल, अशी चर्चा झाल्या; मात्र अद्याप तरी मंजुरी मिळालेली नाही. आता महाराष्ट्र-कामगारदिनी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पटीने गुन्हेगारी देखील वाढलेली आहे. या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, चाकण याही परिसरात गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यामुळे स्वतंत्र आयुक्तालयाची  नितांत गरज निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र आयुक्तालयाची मागणी होत आहे. यावर अधिवेशनात चर्चा झाली. पोलिसांनी अनेक वेळा प्रस्ताव तयार करून ते गृह खात्याकडे पाठवले. प्रस्तावात त्रुटी काढून ते परत पाठवण्यात आले. त्यानंतर  फेरप्रस्ताव पाठवण्यात आले. हे प्रस्ताव वित्त आयोगाकडे पाठवण्यात आले. तेथून ते प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आले; तसेच याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, पुणे शहर, ग्रामीणचे पोलिस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठका झालेल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी लागणारी इमारतही नवनगर विकास प्राधिकरणच्या जुन्या इमारतीमध्ये किंवा नव्या प्रशस्त इमारतीमध्ये देण्यास कोणाची हरकत नाही. शहरातील सर्व राजकीय पदाधिकार्‍यांची यासाठी समिती आहे, तरी देखील शासनाकडून वारंवार चालढकल केली जात आहे. 26 जानेवारीला घोषणा होण्याची शक्यता होती; मात्र प्रस्तावात काही त्रुटी असल्याने तो प्रस्ताव परत पाठवण्यात आला होता. या प्रस्तावातील त्रुटी काढून पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; तसेच फेब्रुवारी महिन्यात याबाबत बैठक झाली आहे. येणार्‍या काही दिवसांमध्ये आयुक्तालयास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रदिनी घोषणा होण्याची दाट शक्यता बैठकीस उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी वर्तवलेली आहे.

स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पुणे शहर पोलिसांच्या झोन तीनमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड, तर झोन चारमधील दिघी पोलिस ठाणे; तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड या पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे. यामध्ये निगडी पोलिस ठाणे आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यातील काही भाग कमी करून तयार होणार्‍या चिखली पोलिस ठाण्याचाही समावेश होणार आहे. स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे दोन झोन असतील. यासोबत वाहतूक विभाग, गुन्हे शाखा असे कामकाज होईल.

पुण्यातील जुनेच अधिकारी आयुक्तपदी? 

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कधी ना कधी होणार हे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना माहित आहे. त्यामुळे अनेकांनी नवीन आयुक्तालयाच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागण्यासाठी केव्हापासून हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयात काम करून सध्या बाहेरच्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांची आयुक्तपदी वर्णी लागते की आणखी कोणाची हे त्या वेळीच समजेल.