होमपेज › Pune › पोलिस आयुक्तालयाच्या जागेची शोधाशोध

पोलिस आयुक्तालयाच्या जागेची शोधाशोध

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 12:53AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी- चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास ‘ग्रीन सिग्नल’ मिळालेला आहे, मात्र अद्याप याबाबत अध्यादेश झालेला नाही. महाराष्ट्र दिनादिवशी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आता 15 ऑगस्टवर गेल्याची चर्चा आहे. मात्र स्वतंत्र आयुक्तालय सुरू करण्यासाठी लागणारी 60 ते 70 एकर जागा आणि इमारत, इतर प्रशासकीय यंत्रणा कोणत्याच प्रकारे उभारलेली दिसत नाही. पुणे पोलिसांकडून शहरातील काही इमारती भाडेतत्वावर देण्यात याव्यात यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार केलेला आहे. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले इंग्रजी माध्यम शाळेची जागेला सर्वांना पसंती दिली असून ती निश्‍चित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, याबाबतही कोणत्याही प्रकारचा अधिकृत निर्णय झालेला नाही.

पोलिस आयुक्तालयासाठी किमान 10 एकर जागेची तर मुख्यालयासाठी 50 एकर जागेची आवश्यकता असल्याचे गृहविभागाकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या जागेचा शोध सुरू आहे. पोलिस मुख्यालयासाठी ताथवडे येथील पशूसंवर्धन विभागाची तसेच स्पाइन रोड, मोशी येथील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या जागा तसेच आळंदी, पिंपळगाव येथील जागेची पाहणी करण्यात आलेली असून याबाबत अहवाल वरिष्ठांना आणि संबंधित विभागास दिलेला आहे. मात्र या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आयुक्तालयासाठी एचए मैदान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोरील जागा तसेच महिंद्रा कंपनीच्या पाठीमागील बाजुच्या जागेची पाहणी केलेली आहे. याशिवाय सहपोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व इतर विभागांकरिताही जागेचा शोध सुरू आहेत. 

तत्तावर पोलिस आयुक्तालयाकरिता प्रेमलोक पार्क, दळवी नगर, भक्ती शक्ती चौक आणि प्राधिकरण येथील महापालिकेच्या शाळांची पाहणी पोलिसांनी केली. त्यापैकी प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले इंग्रजी माध्यम शाळेला पोलिसांनी पसंती दिली. महापालिका आयुक्तांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र त्या इमारतीमधील वर्ग आणि सर्व आस्थापना नवीन ठिकाणी हलवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही वेळ लागणार आहे. या जागेबाबत कोणताही अधिकृत निर्णय झाला नाही. त्यामुळे अजुनही इमारतीची वणवणच म्हणता येईल.

चिखली पोलिस ठाणे येत्या आठ दिवसामध्ये सुरु होण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी वर्तवलेली आहे. या ठाण्याचा अध्यादेश झालेला आहे. मात्र याही ठिकाणी इमारतीचा प्रश्‍न उभा आहे. पोलिसांनी आरटीओच्या जुन्या कार्यालयाची मागणी केली आहे.