Tue, Apr 23, 2019 21:37होमपेज › Pune › प्रत्येक तक्रारीवर पोलिस आयुक्‍तांची नजर

प्रत्येक तक्रारीवर पोलिस आयुक्‍तांची नजर

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 12:29AMपुणे : प्रतिनिधी

स्थानिक पोलिस तक्रारींची दखल घेत नसल्याची नेहमीच ओरड करणार्‍या पुणेकरांना आता दिलासा मिळणार आहे. कारण ‘सर्व्हिस एक्सलन्स अँड व्हिक्टीम असिस्टन्स सेल’ (सेवा) द्वारे प्रत्येक तक्रारीवर थेट पोलिस आयुक्तांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे तक्रारींकडे दुर्लक्ष करणे किंवा नागरिकांना टाळणे, पिटाळून लावणे स्थानिक पोलिसांना भोवणार आहे.

सध्या हा ‘सेवा’ उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर शहरातील 30 पोलिस ठाण्यांत सुरू केला आहे. तक्रार आल्यावर दोन दिवसांत योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे. यावर थेट वरिष्ठांचे नियंत्रण असल्याने संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना योग्य तपास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, ठाण्यात येऊन गेलेल्या तक्रारदाराला आयुक्तांची कमिटी संपर्क करून तक्रार निवारणाबाबत समाधानी आहात का, असा फिडबॅक नोंदवून घेणार आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या नागरिकांना काही प्रकरणात स्थानिक पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नाही. तक्रारी नोंदवून न घेता पिटाळले जाते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक प्रकरणांत पोलिस तक्रारीची दखल घेत नाहीत, अशी सातत्याने ओरड करत असतात.  त्यामुळे समाजात पोलिसांबाबत नकारात्मक भूमिका तयार होत आहे. ही प्रतिमा बदलणे व पुणेकरांच्या मनात विश्‍वास निर्माण करून सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ‘बेसिक पोलिसिंग’चा पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून ही सर्व्हिस एक्सलन्स अँड व्हिक्टीम असिस्टन्स सेल सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर अप्पर पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांच्या देखरेखीखाली शहरातील 30 पोलिस ठाण्यांत सुरू करण्यात आला आहे. यातील काही त्रुटी आढळल्यास त्या सोडवून हा प्रयोग काही दिवसांत अन्य ठाण्यांतही राबवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरातील 30 पोलिस ठाण्यांमध्ये दररोज सरासरी तीनशे ते साडेतीनशे नागरिक विविध तक्रारी घेऊन येत असल्याचे दिसून आले आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून तक्रारी कोणत्या स्वरूपाच्या आहेत, याचीही पडताळणी केली जाणार आहे.   

तक्रार निवारणाबाबत फिडबॅक

पोलिस आयुक्त कार्यालयात यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे. याठिकाणी सर्व पोलिस ठाण्यात दिवसभरातील तक्रारदारांची माहिती या विभागात येईल. त्यानंतर येथून संबंधित कर्मचारी त्या नागरिकाला संपर्क साधतील. तसेच, त्यांना  तुमच्या तक्रारीचा निपटारा झाला का किंवा समाधानाही आहात का? तसेच आपणास आणखी काही मदत हवी आहे का? याबाबत माहिती घेऊन ती आयुक्तांना दिली जाईल. एखाद्या तक्रारीवर नागरिकाचे समाधान झाले नसेल, तर आयुक्तांकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल. त्यानंतर तक्रार सहायक आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे पाठविली जाईल. तसेच, दखल न घेणार्‍या संबंधिताला कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच जास्तीत जास्त या तक्रारींवर दोन दिवसांत कारवाई होणे अपेक्षित आहे. 

असा आहे सेवा उपक्रम

प्रत्येक पोलिस ठाण्याला एक टॅब दिला आहे. दोन महिला व दोन पुरुष असे प्रशिक्षित चार कर्मचारी नेमले आहेत.  पोलिस ठाण्यात दर्शनी भागात उपक्रमाचे नाव असणारा फलक लावला असून, त्याठिकाणी संबंधित कर्मचारी उपस्थित असणार आहे. नागरिक आल्यानंतर संबंधित कर्मचारी त्यांची नोेंद घेईल. या टॅबमध्ये त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता. वेळ तसेच, कामाच्या स्वरूपाची नोेंद घेण्यात येईल. तसेच टॅबद्वारे त्यांचा फोटो घेतला जाईल. तक्रारीनुसार त्या-त्या अधिकार्‍याकडे त्या नागरिकाला पाठविले जाईल. नागरिक पोलिस ठाण्यातून परत जातानाची वेळही यामध्ये नोेंदवून घेतली जाईल. तसेच, वाहतूक विभाग, सायबर किंवा आर्थिक गुन्हे शाखेबाबत तक्रार असेल, तर या तक्रारी संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जातील.

अन्य विभागाच्या अडचणींबाबतही मार्गदर्शन

या उपक्रमाद्वारे पोलिस विभासोबतच इतर विभागांच्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत. एखाद्या व्यक्तीला महापालिका, रुग्णालय किंवा कायदेशीर मदत हवी असल्यास तेथील संपर्क क्रमांक दिले जातील. तक्रार सोडविण्यासाठी काय केले पाहिजे, कोणाकडे जाणे आवश्यक आहे, याची माहिती दिली जाईल. तसेच, मदत हवी असल्यास जिल्हा विधी सेवाकडून कशी मदत मिळू शकते, याबद्दलही मार्गदर्शन मिळू शकणार आहे.