पुणे : लक्ष्मण खोत
एकीकडे हजारोंच्या घरात शुल्क आकारणार्या निगडी प्राधिकरण मधील ऑर्किड द - इंटरनॅशनल स्कूल द्वारे शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती पालकांवर करत, मोठी आर्थिक लूट करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेद्वारे पूर्व प्राथमिक ते इयत्ता 9 पर्यंतंच्या विद्यार्थी पालकांना सरासरी 8 ते 10 हजार रुपयांची पुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची, तसेच 6 हजार 500 रुपयांचा गणवेश सेटही शाळेतून घेण्याची सक्ती पालकांवर करण्यात येत आहे.
यासंबंधी पालक राहूल सहाणी म्हणाले, शाळेद्वारे गेल्यावर्षी साधारण साडे-सहा हजार रुपयांची पुस्तके शाळेतून खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यावेळी पालकांनी अशी सक्ती न करण्याची विनंती केली होती. मात्र, शाळेद्वारे पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली आहे. जर पालकांना शालेय साहित्य शाळेतून घ्यायचे नसेल, तर कोणतेच साहित्य शाळेकडून देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांना आवश्यक एखादे दुसरे पुस्तक देण्यास नकार देऊन, संपूर्ण वह्या पुस्तकांचा संच घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालकांची मोठी अडचण होत आहे. शाळेच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बाहेर मिळत नसल्याने पालकांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अॅार्किड स्कूलला शालेय साहित्य खरेदीत सक्ती न करण्याची मागणी पालकांकडून यापूर्वीही केली होती. मात्र, शाळेद्वारे घेतली तर सर्व पुस्तके शाळेतूनच खरेदी करायची, अथवा सर्वच बाहेरून खरेदी करायची असा फतवा काढण्यात आला आहे. या विरोधात विद्यार्थ्यांचे पालक शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करणार आहोत. - सचिन खरमाळे, पालक