Tue, Jul 23, 2019 02:50होमपेज › Pune › टेकडी फोडून नालाही केला गायब!

टेकडी फोडून नालाही केला गायब!

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:40AMपुणे : पांडुरंग सांडभोर

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात टेकडी फोडून प्लॉटिंग करण्याचा उद्योग समोर आला असतानाच आता याच भागात पाचगाव पर्वती डोंगरातून वहात आलेला नैसर्गिक पावसाळी नाला बुजवून त्यावर प्लॉटिग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेकडी फोडून आणि शेकडो ट्रक राडारोडा टाकून, हे नाले गायब करण्यात आले आहेत. त्याबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रारी करून देखील प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. 

हिंगणे खुर्द येथील आनंद विहार परिसरातून पाचगाव पर्वती डोंगरातून पावसाळी पाण्याच्या नैसर्गिक घळा  वाहत येऊन मोठा नैसर्गिक नाला तयार झाला आहे. हा नाला डोंगरावरून खाली वहात आल्यानंतर आनंद विहारात परिसरात असलेल्या काही खासगी जागा मालकांनी गेल्या दोन ते सहा-सात महिन्यात या डोंगराच्या घळा फोडून, हा नैसर्गिक नाला बुजविण्याचे काम सुरू केले आहे. शेकडो ट्रक राडारोडयाचा भराव टाकून, हा नाला आता पुर्णपणे बुजवून त्याचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात डोंगरावरून वाहून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला खाली येण्यासाठी मार्गच उरला नाही. 

विशेष म्हणजे  डोंगरांच्या पायथ्याशी अनेक सोसायट्या आहेत. हे पाणी थेट नागरवस्तीत शिरण्याची भिती असून, त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता आहे.  मात्र शासकिय यंत्रणा या सगळ्या प्रकाराकडे डोळे झाक करीत आहे. त्यामुळे आता दाद कोणाकडे मागायची असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

तक्रार केल्यानंतर कारवाईचा फार्स

नैसर्गिक नाला बुजविल्याची तक्रार येथील एका रहिवाशाने आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून महापालिकेकडे केली होती. त्यानंतर  प्रशासनाने याठिकाणी येऊन बुजविलेला नाला पुन्हा उकारला; मात्र आधीचा जो नैसर्गिक नाला होता, त्यापेक्षा अतिशय अरुंद आणि वेगळ्याच दिशेला खोदाई करून पाण्याचा प्रवाह काढण्यात आला आहे.  यामुळे आता नागरिकांची घरे खाली आणि भरावाच्या वर नाला असा विचित्र प्रकार याठिकाणी पहायला मिळत आहे.

कात्रज-माळीण सारख्या दुर्घटनेची भिती

काही वर्षांपुर्वी कात्रज घाट परिसरात अशाच पध्दतीने टेकड्या फोडून नाले बुजविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे पाण्याचा प्रवाह  थेट रस्त्यावरून वाहत येऊन मायलेकींना जीव गमवावा लागला होता. त्याचबरोबर माळीण येथे डोंगराचा कडा कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला होता, याच प्रकारची पुनरावृत्ती हिंगणे परिसरात होण्याची भिती आहे.