Mon, May 20, 2019 20:37होमपेज › Pune › टेकड्या फोडून प्लॉटिंग

टेकड्या फोडून प्लॉटिंग

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:48AMपुणे : पांडुरंग सांडभोर

शहराच्या हद्दीतील जैववैविध्य उद्यानाच्या आरक्षित (बीडीपी) जमिनींवर अनधिकृत बांधकामे जोमात सुरू असतानाच, आता या आरक्षित टेकड्या फोडून त्यावर प्लॉटिंग सुरू झाले आहे. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे, वडगाव बुद्रुक त्याचबरोबर वारजे परिसरात बीडीपीत प्लॉटिंगचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडून मात्र त्याकडे डोळेझाक केली जात असल्याने टेकड्या फोडणार्‍यांना अभय मिळत आहे.

पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने महापालिकेत समाविष्ट 23 गावांमधील टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यावर राज्य शासनानेही शिक्का मोर्तब केले आहे. त्याचबरोबर टेकड्यांच्या शंभर मीटर परिसरात बांधकामाला बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने गतवर्षाअखेर घेतला आहे. मात्र, महापालिकेच्या उदासीनतेमुळे बीडीपीची कशी वाट लागली आहे, हे समोर आले आहे. 

गेल्या काही वषार्र्ंत बीडीपीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहिले आहेत. आता मात्र या आरक्षित जमिनींवर थेट प्लॉटिंगच सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे, हिंगणे परिसरात बीडीपी आरक्षित टेकडी फोड करून प्लॉट पाडण्यात आले आहे व जाहिरात करून त्याची विक्री जोमाने सुरू आहे. अगदी वीस ते पंचवीस लाख रुपये प्रतिगुंठा या दराने या प्लॉटची विक्री केली जात असल्याचे सांगण्यात आले. 

हीच अवस्था वडगाव बुद्रुक आणि वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर पठार, सहयोगनगर, आकाशनगर या भागात अनधिकृत बांधकामे आणि प्लॉटिंगचे उद्योग जोरात सुरू आहेत.

एकीकडे शहरातील टेकड्यांची अशा पध्दतीने लचकेतोड सुरू असताना महापालिकेची यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेतली होती, त्यातही बीडीपीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.