Fri, Aug 23, 2019 21:06होमपेज › Pune › दुर्दशा उद्यानांची ...

दुर्दशा उद्यानांची ...

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:27AMखडकीत देखभालीअभावी उद्याने भकास अवस्थेत
 

खडकी : अमोल सहारे

खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये अनेक उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानांमध्ये अनेक खेळणी तुटलेले असून फुलझाडांच्या अभावापोटी तसेच उद्यानामध्ये चालणा़र्‍या प्रेमीयुगुलांच्या चाळयामुळे बालचमू तसेच नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. उद्यानाची भकास अवस्था तसेच नागरिकांनी पाठ फिरून देखील प्रशासन मात्र उद्यानावर कोटीच्या कोटी रुपये खर्च करीत आहेत. प्रशासनाच्या वतीने उद्यानावर करोड रुपये खर्च होत असताना हा पैसा ठेकेदारांना पोसण्यासाठी खर्च करण्यात येतो का असा प्रश् खडकीकर यांच्या मनात उभा ठाकला आहे.  

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये उद्यानाच्या देखभालीसाठी 1 कोटी 30 लाख रुपये खर्चाची निविदा बोर्डाच्या बैठकीत मांडण्यात आली. मात्र उद्यानाच्या कामांची विभागणी तसेच कोणतीही सखोल माहिती, कामगारांच्या तसेच खर्चाचा तपशील निविदात नसल्याने बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन यांनी निविदा थांबविण्याचे आदेश दिले होते. बोर्डाच्या हद्दीमध्ये असलेले 19 उद्यानासाठी तब्बल 1 कोटी 38 लाख रुपये खर्च करण्याची आवश्यकता नसल्याचे मत खडकीकर व्यक्त करीत आहेत.

बोर्डाच्या हद्दीमध्ये असलेले लहान मोठे 19 उद्यान असून त्याच्या देखभालीसाठी बोर्ड प्रशासनाच्या वतीने दरवर्षी निविदा काढण्यात येते. या उद्यानाच्या देखभालीसाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या असून प्रेरणा नर्सरी या ठेकेदाराने दरमहा 12 लाख 77 हजार 500 रुपये खर्चाची निविदा भरण्यात आली असून वर्षाला 1 कोटी 53 लाख 30 हजार रुपये, तर ग्लोबल इंटरप्रायझेस या ठेकेदाराने 12 लाख 25 हजार प्रमाणे वर्षाला 1 कोटी 47 रुपये तसेच मेहता अँड शहा इंटरप्रायजेस या ठेकेदार आणि दरमहा 11 लाख 55 हजार सहा रुपये प्रमाणे 1 कोटी 38 लाख 70हजार 72 रुपयांच्या निविदा भरण्यात भरल्या आहेत. 

 उद्यानाची मोठी दुरवस्था 

बोर्डाच्या हद्दीमध्ये एकोणीस उद्यानासाठी करोडो रुपयांच्या निविदा सादर करण्यात आल्या आहेत. दरम्यान बोर्डाच्या हद्दीमधील उद्यानाची पाहणी केली असता अनेक उद्यानांमधील अनेक खेळणी तुटक्या अवस्थेत पडलेल्या आहेत, उद्यानांमध्ये खेळणी तुटलेले असल्याने खेळण्याचे केवळ सांगाडेच पडले असल्याचे दिसते, काही उद्यानांमध्ये शोधूनही एकही फुलझाडे आढळले नसल्याचे दिसून आले. तर साप्रस येथील राजीव गांधी उद्यान केवळ प्रेमी युगलांचे ठिकाण बनले आहे. 

राजीव गांधी उद्यानामध्ये अनेक झाडामागे, आडोशाला अनेक प्रेमी युगुल बसलेले दिसतात. उद्यानामध्ये चालणार्‍या प्रेमलीलांना मात्र सुरक्षारक्षक देखील अटकाव करीत नसल्याचे समजते. प्रेमी युगुलांच्या प्रेमलीलाना ऊत आल्याने या ठिकाणी बालचमूंचा नव्हे, तर अनेक नागरिकांनी देखील पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. रेंजहिल्स येथील अनेक उद्यानांची अवस्था भकास झाली असून या उद्यानासाठी करोड रुपये का खर्च करण्यात येत आहे असा प्रश्न आता समस्त खडकीकरांसमोर उभा ठाकला आहे. 

खडकी बाजारातील राणी लक्ष्मीबाई उद्यानामध्ये दिवसा ढवळ्या अनेक जण दारू पीत असल्याचे दिसून आले. उद्यानामध्ये साफसफाईचा अभाव तसेच फुलझाडांचा अभाव, अंतर्गत पदपथाची दुरावस्था, प्रेमी जोडप्याचा हौस यामुळे अनेकांनी या उद्यानाकडे पाठ फिरविल्याचे नागरिकांनी सांगितले. उद्यानांमध्ये असलेले कारंजाची मोठी दुरावस्था झाली असून उद्यानांमध्ये केवळ डायनोसॉर, गेंडा, हत्ती, जिराफ, हरीण या प्राण्यांच्या फायबरच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्याने उद्यानाची तेवढी शोभा उरली आहे. उद्यानांमध्ये चाललेल्या अनेक प्रेमलीलांमुळे अनेक वेळा पोलिसांना देखील याची कल्पना देण्यात येते. मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

इंद्रप्रस्थ उद्यानात डुकरांचे साम्राज्य

उदय पोवार

येरवड्यातील नागरीकांना इंद्रप्रस्थ उद्यानाची फार पूर्वीपासून ओळख आहे. हिरवंगार लॉन, फुलराणी, खेळणी अशा विविध साहित्यांनी उद्यान भरले असल्या मुळे सकाळ-संध्याकाळ उद्यानात येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. एक रूपया तिकिट देखील उद्यानात येणार्‍यांसाठी ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. त्याठिकाणी गेले की, खरच येथे उद्यान होते की काय असे चित्र दिसते. उद्यानातून जाणारी पाण्याची लाईन फुटल्याने उद्यानातील रस्त्यावर चिखल झाला आहे. त्या चिखलातच डुकरांचा कळप असतो. फुलराणी काढण्यात आली आहे. साहित्यांची मोडतोड झाली असून साहित्य चोरीला गेले आहे. लॉन तसेच विविध प्रकाराच्या वनस्पती सुकून गेल्या आहेत. पाईप लाईन, कारंजा यांची दुरावस्था झाली आहे.

उद्यानातील काही जागेवर तर नगरसेवकांनी कचरा वर्गीकरण रॅम्प बनविण्याचा प्रयत्न चालविला होता. त्याला विरोध झाल्यामुळे त्याठिकाणचे पत्रे काढण्यात आले आहेत.उद्यानातील साहित्यांची रोज चोरी होत आहे. याठिकाणी अधिकृत असा कोणीही सुरक्षा रक्षक नाही. उद्यानातील सुरक्षा रक्षकांसाठी असलेल्या खोलीत उद्यान विभागाने नेमणुक न करताच अज्ञात कुटुंब रहावयास आले आहे. एकंदरीतच अगोदरच  हिरवंगार असलेले इंद्रप्रस्थ उद्यान अन आताचे ओसाड उद्यान पाहिले की येरवड्यातील नागरीक नाराजी व्यक्त करत आहेत. आई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष यश चव्हाण म्हणाले, उद्यान जर तातडीने विकसित केले नाही तर  आपण उद्यानातील डुकरे क्षेत्रीय कार्यालयात डुकरे सोडून निषेध नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले, उद्यानाच्या सुरक्षितेसाठी सर्व प्रथम सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे. येत्या काळात निधी उपलब्ध करून अगोदर पेक्षाही सुसज्ज असे उद्यान तयार करणार आहे.

Tags : Pune, Plight, gardens