Thu, Apr 25, 2019 16:13होमपेज › Pune › जलतरण तलावांची दुर्दशा

जलतरण तलावांची दुर्दशा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महापालिकेने नागरिकांसाठी शहरात जलतरण तलाव बांधले पण याचा ठेका ठेकेदारांकडे दिल्याने या वर कसलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अनेक तलावांची दुरवस्था झाली असून, दुरूस्ती लवकर केली जात नाही. याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत. 

वारजेत नागरिकांची गैरसोय

वारजे : वारजे प्रभागातील जलतरण तलावाची अवस्था देखभाल व दुरुस्तीअभावी नागरिकांची गैरसोय होत असून पोहण्यासाठी येणार्‍या नागरिकांची सुरक्षा भगवान भरोसे दिसत आहे. वारजे परिसरातील कै. गणपत बाळकृष्ण बारटक्के या नावाने सुरू असलेला गार्डन सिटी लगतच्या   जलतरण तलावावरील सुरक्षा छताची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर त्याच प्रभागात असलेले छञपती शिवाजी महाराज जलतरण तलावावर छत नसल्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना पोहण्याचा सराव करावा लागत आहे. या दोन्हीही  जलतरण तलावाच्या शेजारी मोठ मोठ्या इमारती आहेत. 

तलावामध्ये पुरूष युवकांच्या सह महिला वर्गाचेही पोहण्याचे प्रमाण जास्तीचे असून या तलावांवरील  छताच्या दुर्दशेमुळे तलावाचा लाभ घेणा-या नागरिकांच्या प्रमाणात महिला वर्गाची सुरक्षिततेची गंभीर समस्या उभी राहिली आहे.  परिणामी तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हातात घेऊन महापालिकेने नागरिकांच्या डोक्यावरील असुरक्षिततेची टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरासह उपनगरातही पोहण्यासाठी एक चांगला तलाव उपलब्ध होत नव्या जलतरणपटूंची निर्मिती व्हावी, यासाठी महापालिकेने जलतरण तलावाची उभारणी केली आहे. 

परंतु प्रशासन आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षित कारभारामुळे बारटक्के जलतरण तलावावरील तुटलेले छत,  तुटकी आसनव्यवस्था, शौचालयाची तुटलेली दारे,  प्रशिक्षित कर्मचा-यांचा अभाव, जलतरण महिला प्रशिक्षकाची उणीव आणि सफाई कर्मचा-यांची कमतरता, तसेच छञपती शिवाजी महाराज जलतरण तलावावर छत नसल्यामुळे महिला नागरिकांमध्ये असुरक्षिततेच्या भावनेने महिलांची कुचंबणा होताना दिसते आहे. 

पकरणामी शारीरिक व्यायाम आणि ईच्छा आकांक्षांना बळ मिळण्यासाठी तलावावर पोहण्यासाठी येणार्या लहान मुला मुलींनसह तरुणाईची निराशा होताना दिसत आहे. सध्या उन्हाळा सुरु असून. शाळांच्या उन्हाळी सुट्टीत या तलवांवर पोहण्यासाठी नागरिकांची  मोठी गर्दी होत असते.  तलाव चालविणार्‍या ठेकेदारांनी कोणते नियम पाळावे, याचा करार पालिका प्रशासन करते. परंतु, ठेकेदार हे नियम पाळतात की नाही याची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. 

-प्रदीप बलाढे

खराडीतील जलतरण तलावाला टाळे

चंदननगर : पुणे शहरात  राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू तयार व्हावेत म्हणून पुणे मनपाने शहरासह उपनगरात सुसज्ज असे अत्याधुनिक जलतरण तलाव बांधले आहेत. सध्या ऊन्हाची दाहकता ही खूपच वाढत आहे, त्यामुळे लहान थोरांना  जलतरण तलावात पोहण्याचा मोह होतो आहे. ठराविक मंडळी काही खासगी जलतरण तलावात  शुल्क भरुन आपल्या पोहण्याचा आनंद लुटतात. पण बहुतेकांना खासगी तलावाचा वापर शक्य नसतो.खराडी, चंदननगर, नगररस्त्याच्या अगदी जवळच असलेल्या रक्षक नगर येथील मनपाचा  जलतरण तलाव काही वर्षापासून सुसज्ज स्थितीत आहे पण वापराविना पडून आहे. याच्या मागे काय कारण आहे त्याचा आम्ही शोध घेतला तेव्हा खरी परिस्थिती समोर आली. 

नागरिकांच्या कररुपी पैशातून शहराच्या सार्वांगीन विकासासाठी सुसज्ज असा जलतरण तलाव खराडीत बांधून देखील त्याचा वापर होत नाही म्हणून सजग नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व सामान्य नागरिकांना तसेच खेळाडूंना सराव करण्यासाठी पालिकेचे तलाव आवश्यक असतात पण ते वापरले जात का नाहीत. नगरसेवक महेंद्र पठारे यांनी सांगितले की, टेंडर प्रक्रियेत तलाव आडकले आहेत.

वडगावशेरी शिवसेना निरीक्षक मंदार निकम यांनी सांगितले नागरिकांसाठी बांधलेला तयार जलतरण तलाव जर पंधरा दिवसात पालिकेने व स्थानिक नगरसेवकांनी खुला केला नाही तर शिवसेना चंदननगर खराडीतील नागरिकासह आंदोलन करेल. पालिकेतील अधिकार्‍यांनी टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करुन अनुभव असणार्‍या ठेकेदारास काम द्यावे व तत्काळ जलतरण तलाव लोकार्पण करावा.परिसरातील जलतरण तलाव लवकर सुरू व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. तरी मनपा प्रशासनासह ,वडगावशेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी ही या विषयात लक्ष घालावे असे मत काही युवा खेळाडूंनी व्यक्त केले.

-नितीन जाधव

खडकीत नाही एकही तलाव

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये एकही जलतरण तलाव नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. नागरिकांना तलावामध्ये पोहण्यासाठी जवळपासच्या अन्य जलतरण तलावावर जावे लागत असून प्रशासनाने जलतरण तलाव तयार करण्यासाठी पावले उचलावी अशी अपेक्षा खडकीकर करीत आहेत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंगाची लाही लाही होत असताना जलतरण तलावावर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, मात्र बोर्डाच्या हद्दीमध्ये एकही जलतरण तलाव नसल्याने नागरिकांची नागरिकांच्या पदरी निराशा पडत पडत आहे. बोर्डाच्या हद्दीत एकूण 70 हजार 399लोकसंख्या आहे, तर यामध्ये 23 हजार 196 नागरी तर 1 हजार 357 सैन्याची असे एकूण 24 हजार 553 अधिकृत मतदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अनधिकृत बांधकाम करणार्‍यांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बोर्डाच्या मतदार यादीतून तब्बल 11 हजार 841 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

बोर्डाच्या हद्दीमध्ये एकूण 70 हजार 399 लोकसंख्या असून एवढ्या लोकसंख्येसाठी एकही जलतरण तलाव नाही. तर जलतरण तलावावर पोहण्याची मजा घेण्यासाठी काही मुले मात्र मुळा नदी काठी असलेल्या  धबधब्यावजा पाण्यात पोहण्याची मजा घेत असल्याचे दिसते. नवीन होळकर पुलाखाली एक लहान धबधबा तयार एक झाले असून या ठिकाणी अनेक मुले मुली पोहण्याचा आनंद धोकादायक पद्धतीने लुटताना दिसतात.

-अमोल सहारे

जलतरण तलावावर पोहण्यासाठी गर्दी 

धनकवडी ः  सध्या  उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे.त्यामुळे  तीन हत्ती (  म.ज्योतिराव फुले ) चौकातील महापालिकेचे विष्णू उर्फ अप्पा जगताप क्रीडा संकुल व  जलतरण तलावात पोहण्यासाठी परिसरातील  आबालवृद्ध गर्दी करू लागले आहेत.या जलतरण तलावाचे व्यवस्थापन श्री सदगुरू शंकर महाराज क्रीडा प्रतिष्ठान यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा काही दिवसातच संपतील.तसेच  मराठी माध्यमांच्या शाळांचे निकाल लागावयाचे आहेत.त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासाचा डोक्यावरील  ताण कमी झाला आहे.त्यामुळे सुटीची आनंद मनमुराद घेण्यासाठी व उन्हापासून बचाव करण्यासाठी जलतरण तलावात पोहण्यासाठी मुले-मुली गर्दी करू लागले आहेत.शनिवार व रविवार शासकीय व खासगी कार्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे या दोन दिवशी गर्दी जास्त होते.या जलतरण तलावात सकाळी तीन व दुपारी चार अशा पोहण्यासाठी बॅचेस असून दुपारी महिला- मुलींसाठी विशेष बॅच ठेवण्यात आली असल्याचे या तलावाचे व्यवस्थापक प्रकाश कळसे यांनी सांगितले.तसेच मुला-मुलीं साठी उन्हाळी शिबिरात पोहण्याच्या शिकवणीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. तलावावर पोहायला शिकवण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.तसेच सुरक्षेसाठी लाईफ गार्डही डोळ्यात तेल घालून सज्ज झाले आहेत.चव्हाणनगर,संभाजीनगर,धनकवडी,बालाजीनगर,तळजाई परिसरातील आबालवृद्ध  या जलतरण तलावाचा लाभ घेत आहेत.सध्या गेली दोन वर्ष हा जलतरण तलाव सलग सुरू असून त्यापूर्वी मात्र पाच वर्षे हा तलाव बंद होता.

-बाजीराव गायकवाड

फी वाढीवर नाही पालिकेचे नियंत्रण

येरवडा ः उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंग्रजी माध्यमांच्या मुलांना शाळांना सुट्टया लागल्याने पोहण्यासाठी जलतरण तलावावर अबालवृध्दांची गर्दी पहायला मिळते. येरवड्यातील केशवराव ढेरे जलतरण तलाव व आळंदी रस्त्यावरील परूळेकर विद्यालयाजवळील देवकर जलतरण खासगी चालकाकडून आकारण्यात येत असलेल्या फी वाढीवर महापालिकेचे नियंत्रण नाही. येरवड्यातील नागरिकांची या खासगी चालकांकडून लूट होत आहे. क्रीडा संकुलातील तलावामध्ये देखील सकाळपासून सायंकाळ पर्यंत सर्व बॅचेस फुल्ल आहे.  विशेषतः शनिवार व रविवारही जलतरण तलावात पोहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. डेक्कन कॉलेज रोडवर असणार्‍या केशवराव ढेरे जलतरण तलावावर व आळंदी रस्त्यावरील  परूळेकर विद्यालजवळील देवकर जलतरण तलावात गर्दी दिसू लागली आहे. 

महापालिकेतर्फे जलतरण तलाव चालवण्याचा ठेका खाजगी संस्थेला देण्यात आला आहे. मात्र ठेकेदारांकडून एका व्यक्तीकडून 50 रूपये दर आकारला जात आहे.  सकाळी सहा वाजल्यापासून  बॅचेसना प्रारंभ होतो.एक तासाची एक बॅच असते. रात्री नऊपर्यंत बॅचेस असतात. सकाळच्या सत्रातील सर्व बॅचेसना गर्दी असते. तर शनिवार व रविवार कंपन्या, कॉल सेंटर, शासकीय व खाजगी ऑफीसना सुट्ट्या असल्यामुळे या दोन दिवशी गर्दी जास्त होते. त्यामुळे जलतरण तलाव चालवणार्‍यांचा यादिवशी गल्ला फुल्ल होतो. प्रत्येकी पन्नास रूपये याप्रमाणे दर आहेत तर महिना पासचेही वेगळे दर आहेत. पोहायला शिकवण्याचेही वेगळे दर आहेत. तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

-उदय पोवार 
 


  •