Thu, Aug 22, 2019 11:21होमपेज › Pune › ‘स्थायी’च्या आजवरच्या सर्व अध्यक्षांच्या निर्णयाची चौकशी करा : भापकर

‘स्थायी’च्या आजवरच्या सर्व अध्यक्षांच्या निर्णयाची चौकशी करा : भापकर

Published On: Feb 03 2018 5:23PM | Last Updated: Feb 03 2018 5:23PMपिंपरी : प्रतिनिधी

भाजपा पदाधिकार्‍यांनी स्वत:चा भ्रष्टाचार, लपवण्यासाठी इशारेबाजी करण्याऐवजी आजवरच्या सर्व स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यकालातील गैरकारभाराची चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

यासंदर्भात भापकर यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची १५ वर्षे सत्ता होती. या कार्यकालातील अनेक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आपण व विद्यमान पदाधिकार्‍यांनी आवाज उठविला होता. पालिका निवडणुकीत भ्रष्टाचार व गैरकारभाराचा मुद्दा करून, भय, भ्रष्टाचारमुक्त पालिका करण्याचे आश्वासन देत  सत्ता संपादन केली. सत्तेवर आल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेडगे  व सारंग कामतेकर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकालातील  गैरव्यवहारांची जी प्रकरणे काढली होती, त्याबाबत मागील अकरा महिन्यांत त्यांना कोणी रोखले नव्हते. त्यांचा कार्यकाल अत्यल्प राहिला आहे. त्यांच्या कार्यकालात त्यांनी उघड केलेल्या प्रकरणांचे नक्की झाले काय, यावर भाजपाने स्पष्टीकरण द्यावे.

स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी पदभार स्वीकारताना टक्केवारी मला माहिती नाही म्हणूनच मी येथपर्यंत पोचली असे वक्तव्य केले होते. मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माजी सभापती प्रशांत शितोळे, उषाताई वाघिरे यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्यकालात ते जेवढी टक्केवारी घेत होते तेवढीच मी घेतली आहे, असे वक्तव्य करून त्यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराचा कबुलीजबाबच दिला आहे. पूर्वीच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यकालातील निर्णयांच्या फायली काढण्याची धमकीच त्यांनी दिली आहे.

शहरात कचर्‍याची वाहतूक ९०० रु. प्रति टनाप्रमाणे केली जात असताना या निविदेच्या माध्यमातून हा दर १९०० रु. प्रति टन करण्याचा घाट घातला जात असून, त्यातून करदात्यांचे २५२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे, असा आरोप माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी केला. त्यावर राष्ट्रवादीने भाजपावर बिनबुडाचे आरोप करणे थांबविले नाही, तर भाजपाला राष्ट्रवादीची महापालिकेतील गैरकारभाराची प्रकरणे बाहेर काढावी लागतील, असा इशारा एकनाथ पवार यांनी दिला.

मात्र, राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांच्या काळात गैरप्रकार, भ्रष्टाचार होत होता म्हणून तुम्हाला भ्रष्टाचार व गैरव्यवहार करण्याचे लायसेन्स दिले नाही. तुम्ही या काळात करीत असलेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत कोणी काही बोलले तर त्यांच्या फायली काढू, अशा धमक्या देऊन  भ्रष्टाचार, गैरव्यवहार पचविण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे.  खरोखर दम असेल, तर या आधीच्या स्थायी समिती अध्यक्षांंच्या कार्यकालातील निर्णयांची व विद्यमान सभापती सीमा सावळे यांच्याही कार्यकालातील निर्णयांची चौकशी करावी व वस्तुनिष्ठ अहवाल जनतेसमोर ठेवावा, असे आव्हान भापकर यांनी दिले आहे.