होमपेज › Pune › क्रीडांगणे उद्घाटनाविनाच!

क्रीडांगणे उद्घाटनाविनाच!

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:06AMपिंपरी ः संजय शिंदे 

भोसरी विधानसभा मतदारसंघातील इतर प्रभागात  सुसज्ज  मैदाने  व्हावीत  यासाठी  प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत; परंतु प्रभाग 8 इंद्रायणीनगर येथील सेक्टर नंबर 4, 9 आणि 10 येथे अद्यावत आणि आंतरराष्ट्रीयस्तराची क्रीडांगणे उभारून ती नवनगर विकास प्राधिकरणाने महापालिकेकडे हस्तांतरीत करुन सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे; मात्र ही मैदाने उद्घाटनाविना धूळखात पडली आहेत. प्रभागातील स्थापत्य कामाबाबत नगरसेवकांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. शहकटशहाच्या राजकारणाला त्याठिकाणी ऊत येतो; परंतु प्रभागवासियांच्या मुलांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी मैदाने उद्घाटनाविना आहेत, त्याकडे त्यांचे का लक्ष जात नाही असा प्रश्‍न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. 

नवनगर विकास प्राधिकरणाने कोट्यवधी रुपये खर्च करुन मैदाने उभी करुन पालिकेकडे हस्तांतरीत केली. त्याठिकाणी पाणीपुरवठा, वीज आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक हे मुलभूत प्रश्‍न न सोडविल्यामुळे धुळखात पडली आहेत. यासाठी वारंवार क्रीडा प्रशासनाने पाठपुरावा केला आहे ; परंतु संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना टक्केवारीतच जास्त रस असल्यामुळे  मैदानांच्या सोयी-सुविधांकडे ते दुर्लक्ष करत आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये या मैदानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यावर एकमत होत नसल्यामुळे उद्घाटन रखडल्याची चर्चा आहे.

सेक्टर नंबर 4, 9 आणि 10 मध्ये प्राधिकरणाने महापालिकेकडे हस्तांतरीत केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरीली मैदानाची पाहणी करुन त्याठिकाणी निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उकल करण्यात येईल. त्यानंतर संबंधित विभागाला याबाबत सूचना करुन डागडुजी करुन  महिन्याभरात खेळाडूंसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. - विलास मडिगेरी, नगरसेवक, भाजप

बास्केटबॉल, टेनिस कोर्ट आणि हॉकी मैदान विकसित करून  प्राधिकरणाने पालिकेकडे मैदाने वर्ग केली आहेत; परंतु मैदान डागडुजीच्या अनुषंगाने संबंधित अधिकार्‍यांच्या वेळकाढूपणामुळे ती खेळाडूंसाठी खुली झाली नाहीत. याबाबत मी स्वतः पाठपुरावा केला आहे. येत्या पंधरा दिवसाच्या आत मैदाने सर्व सायीनीयुक्त खुली केली नाही तर राष्ट्रीवादी काँग्रेसच्यावतीने या मैदानाची उद्घाटने करण्यात येतील.  - विक्रांत विलास लांडे, नगरसेवक, राष्ट्रवादी