Sat, Jul 20, 2019 15:25होमपेज › Pune › शाळेच्या जागेवर क्रीडांगणाच्या आरक्षणाचा डाव उधळला

शाळेच्या जागेवर क्रीडांगणाच्या आरक्षणाचा डाव उधळला

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

शहराच्या विकास आराखड्यात धनकवडी येथील शाळेच्या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण टाकून क्रीडांगणाचे आरक्षण असलेली जागा निवासी करण्याचा डाव अखेर फसला आहे.  विकास आराखड्यात आरक्षण बदलण्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर आता राज्य शासनाने शाळेच्या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण हटवून शाळेचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी हरकती-सूचनांची प्रक्रिया राबविली आहे.

महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे हा आराखडा राज्य शासनाने स्वत:च्या ताब्यात घेऊन तो तयार केला होता, मात्र, त्यातही गैरकारभार झाल्याचा एक प्रकार नुकताच उजेडात आला होता. तळजाईच्या पायथ्याशी धनकवडीतील सर्व्हे न. 6 येथे विकास आराखड्यात शाळेचे आरक्षण होते, मात्र, प्रत्यक्षात आराखड्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेत हे आरक्षण परस्पर बदलून त्यावर क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्यात आले होते. तर याच ठिकाणी सर्व्हे न. 9 मध्ये असलेले क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करून ते निवासी करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे समोर आले होते, 

त्यासाठी शाळेच्या आरक्षणाच्या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण हलविण्याचा घाट घातला गेला होता,  मात्र, हा प्रकार काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आला, त्यानंतर उर्वरित आराखडयास मंजुरी देताना क्रीडांगणाच्या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण ठेवण्याचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे, तर, शाळेच्या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्यासाठी राज्य शासनाने कलम 37/1 अन्वये हरकती सूचनांची प्रक्रिया राबविली .  त्यासंबधीचे आदेश नगरविकास विभागाने नुकतेच काढले आहेत.  त्यानुसार धनकवडी येथील सर्व्हे न. 6 मधील शाळेचे आरक्षण कायम ठेवून क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्यासाठी हरकती-सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली असून सहसंचालक नगररचना, पुणे यांच्या कार्यालयात या हरकती-सूचना द्यायच्या आहेत. त्यामुळे क्रीडांगणाची जागा निवासी करण्याचा आणि शाळेच्या जागेवर क्रीडांगण टाकण्याचा डाव उधळला आहे.