होमपेज › Pune › क्रीडा शिष्यवृत्तीत खेळाडूच मागे

क्रीडा शिष्यवृत्तीत खेळाडूच मागे

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:29AMपुणे : सुनिल जगताप

राष्ट्रीयस्तरावर विविध क्रीडा प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझपदक विजेत्यांना, तसेच प्राविण्यप्राप्‍त खेळाडूंना शासनाकडून क्रीडा शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन दिले जाते, परंतु या शिष्यवृत्तीमध्ये यावर्षी खेळाडूच मागे असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ 60 टक्केच शिष्यवृत्तींचे वाटप झाले असून, इतर खेळाडूंच्या बँक खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत दरवर्षी राष्ट्रीयस्तरावर सहभाग आणि प्राविण्यप्राप्‍त खेळाडू विद्यार्थ्यास शासनातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात  विजेत्यास 11 हजार 250 रुपये, द्वितीय स्थानास 8 हजार 950 रुपये, तृतीय स्थानास 6 हजार 750 रुपये तर सहभागप्राप्‍त खेळाडूंना 3 हजार 750 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी 2017-18 च्या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून ऑनलाइन माहिती मागविण्यात आली होती. आलेल्या अर्जांमध्ये जिल्ह्यातील 610 खेळाडू शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यासाठी शासनाकडून 40 लाख 94 हजार 250 रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. आतापर्यंत 385 खेळाडूंपर्यंतच हा निधी पोहोचला असून, उर्वरित 225 खेळाडूंपर्यंत अद्याप ही रक्‍कम पोहोचलेली नाही. 

दरवर्षी खेळाडूंना शिष्यवृत्ती देताना संबंधित शाळांकडून माहिती घेऊन, त्यांच्याकडेच शिष्यवृत्ती रकमेचा धनादेश दिला जात होता, परंतु हा धनादेश संबंधित खेळाडूंपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार क्रीडा विभागाकडे आल्याने या वर्षीपासूनच खेळाडूंच्या बँक खात्यामध्ये थेट ‘आरटीजीएस’द्वारे रक्‍कम पाठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय क्रीडा विभागाच्या अधिकार्‍यांनी घेतला. त्यामुळे अद्यापही 225 खेळाडूंनी आपल्या बँक खात्याची माहिती क्रीडा विभागाला कळविली नसल्याने ही रक्‍कम तशीच राहिलेली आहे.

याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान म्हणाले की, ऑनलाइन पद्धतीने संबंधित राष्ट्रीय खेळाडूंची शिष्यवृत्तीसाठी माहिती मागविली होती. त्यामध्ये 610 खेळाडू या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, या खेळाडूंच्या बँक खात्यामध्ये ‘आरटीजीएस’द्वारे रक्‍कम अदा केली जात आहे, परंतु अद्यापही 225 खेळाडूंनी बँक खात्याची माहितीच क्रीडा विभागाला दिलेली नाही. संबंधित खेळाडूंच्या शाळा, क्रीडाशिक्षक अथवा पालकांशी संपर्क साधून ही माहिती घेण्याचे काम सुरू असून लवकरच उर्वरित खेळाडूंपर्यंत हा निधी पोहोचेल.