Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Pune › प्लास्टिक वेस्टपासून पावसाळ्यापूर्वी होणार २५ किमीचा रस्ता

प्लास्टिक वेस्टपासून पावसाळ्यापूर्वी होणार २५ किमीचा रस्ता

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:51AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने ‘प्लास्टिक वेस्ट’ पासून रस्ते तयार करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रयोगिक तत्त्वावर तयार केलेला दीड किलोमीटरचा रस्ता यशस्वी झाला असून येत्या पावसाळ्यापूर्वी 25 किमीचा रस्ता करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पथविभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. 

शहरातील प्लास्टिक कचरा समस्येच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्त्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यासाठी पालिकेने डाऊ केमिकल आणि रुद्र एनव्हायरमेंटल या कंपन्याशी सामंजस्य करारा केला आहे. गत वर्षी दीड किमीचा रस्ता प्रायोगिक तत्वावर पूर्ण केला. या पार्श्‍वभूमीवर गेल्या सहा-सात महिन्यांपासून सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून दैनंदिन रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिदिन दीडशे टन प्लास्टिक मिक्स डांबराचा उपयोग केला जात आहे. 

रस्त्याच्या डांबरीकरणासाठी खडी, डांबर आणि इतर रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. एक टन डांबरमिश्रित खडी तयार करण्यासाठी 45 किलो डांबर वापरण्यात येते. यामध्ये आता 8 टक्क्यांपर्यंत प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. रस्ते दुरुस्तीसाठी प्लास्टिकचा ठरावीक प्रमाणात वापर केल्याने रस्त्यांचा टिकाऊपणा वाढत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. यामुळेच आता येत्या दोन-तीन महिन्यात शहराच्या विविध भागात सुमारे 25 किलो मिटरच्या डांबरी रस्त्यांवर प्लास्टिक मिस्क डांबराचा वापर करण्यात येणार आहे.

यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य वस्तू ठरावीक तापमानात वितळवल्यानंतर त्याचा रस्त्यासाठी वापर करता येतो. शासनाच्या ‘इंडियन रोड काँगे्रस’ च्या निकषांनुसारच प्लास्टिकचा रस्त्यांसाठी उपयोग करण्यात येत आहे. तसेच यामुळे रस्त्यांचा टिकाऊपणा वाढत असल्याचे पालिकेच्या  पथ विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले आहे.