Tue, Jun 25, 2019 13:17होमपेज › Pune › शेकोट्यांत टायरसह जाळला जातो प्लास्टिकचा कचरा

शेकोट्यांत टायरसह जाळला जातो प्लास्टिकचा कचरा

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:58PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे हुडहुडी भरणार्‍या या थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत; मात्र या शेकोट्यांमधे लाकडे किवा गोवर्‍या न जाळता सायकल-दुचाकीचे टायर व प्लास्टिकचा कचरा जाळला जात आहे. यामुळे थंडीत ऊब मिळत असली तरी टायर व प्लास्टिक कचरा जाळल्याने पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून, याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत शहरातील पर्यावरण अभ्यासकांनी केले आहे. 

ग्रामीण भागात शेकोट्या पेटवण्यासाठी लाकडे, गोवर्‍या; तसेच सरपण वापरले जाते; मात्र शहरात हे उपलब्ध होत नाही. त्यामुळे थंडी पळवण्यासाठी टायर जाळले जात आहेत. टायर जाळल्याने निघणारा धूर हा आरोग्यास धोकादायक आहे;  तसेच त्यामुळे पर्यावरणासही बाधा पोचत आहे. खासकरून सकाळच्या वेळेस या शेकोट्या पेटवण्याचे प्रमाण अधिक आहे. थंडीत व्यायाम करणार्‍यांची संख्या सर्वांत जास्त असते. थंडी आरोग्याला लाभदायक असते. त्यामुळे थंडीत सकाळी फिरायला जाणार्‍यांची संख्या अधिक असते. यात ज्येष्ठ नागरिक, महिला; तसेच मुलांचा समावेश असतो. अशा या आरोग्यदायी थंडीत शेकोटी पेटवण्यासाठी टायर व प्लास्टिकचा सर्रास वापर करण्यात येत आहे. 

शहरात पोटापाण्यासाठी येणार्‍या स्थलांतरितांचे प्रमाण सर्वाधिक आहे; परंतु जागेअभावी ते पुलाखाली किवा नदीकाठी आसरा घेत असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी जवळच असणार्‍या गॅरेज; तसेच भंगार दुकानाजवळील टायर जाळत आहेत. त्यामुळे शहरात सध्या धुक्याबरोरच प्लास्टिक कचरा जाळल्याने धुराचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. काही भागात महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांकडूनही हा कचरा जाळला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने या गोष्टीस लवकरात लवकर प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.

टायर जाळणे बेकायदा 

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर जबाबदारी सोपवली असून, सार्वजनिक ठिकाणी टायर जाळून वायुप्रदुषण निर्माण करणे हे बेकायदेशीर आहे. याअंतर्गत मोकळ्या जागांंवर टायर जाळण्यास बंदी; तसेच वीटभट्टी  किंवा संबंधित ठिकाणी इंधन म्हणून वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहे.