Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Pune › प्लास्टिकबंदीचे वाजले की बारा..

प्लास्टिकबंदीचे वाजले की बारा..

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी 

पर्यावरणाला घातक ठरणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी घालून दोन महिने झाले आहेत; मात्र पुणे शहरात या बंदीचे सर्रास उल्लंघन होत आहे. फेरीवाले, हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांच्याकडून खुलेआम पिशव्या दिल्या जातात. महापालिकेतर्फेही प्लास्टिकचा वापर करणार्‍यांविरुद्ध कारवाई थंडावल्याने प्लास्टिकबंदीचे बारा वाजल्याचे चित्र आहे.  

शहरातील फर्ग्युसन रस्ता, मंडई, लक्ष्मी रोड, शुक्रवार पेठ अशा प्रमुख ठिकाणी ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी प्लास्टिकबंदी कितपत यशस्वी झाली, याबाबतची तपासणी करण्यासाठी काही भागातील दुकानात ग्राहक म्हणून भेट दिली. त्यामध्ये प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे समोर आले.

घटना क्र. 1 :  तुळशीबाग येथे किरकोळ साहित्य खरेदी केल्यावर प्लास्टिक पिशवीची मागणी करण्यात आली. सर्वात आधी ‘प्लास्टिकबंदी आहे’ असे उत्तर दुकानदाराने दिले, मात्र सामान नेण्यासाठी काहीच नसल्याचे सांगत सामान खरेदी करण्यास प्रतिनिधीने नकार दिल्यावर त्या विक्रेत्याने हळूच प्लास्टिक पिशवीचा गठ्ठा हातात घेऊन त्यातल्या एका पिशवीत सामान दिले. ‘आता कशी पिशवी काढली’ असे विचारले असता पिशवीपायी गिर्‍हाईक जाऊ नये असे विक्रेत्याकडून उत्तर मिळाले. 

घटना क्रं 2: फर्ग्युुसन रस्ता  परिसरात पाणीपुरी दुकानात  प्रतिनिधीने पार्सल पाणीपुरी मागितली. त्यावेळी दुकानदाराने प्रतिनिधीला लगेच दोन प्लास्टिक पिशवीत (या पिशव्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या होत्या.) आंबट-गोड पाणी पार्सल दिले. त्यानंतर  पुरी आणि पाण्याच्या पिशव्या एकत्रित कागदी पिशवीत बंद करून पार्सल हातात सोपवल्या.

घटना क्रं 3:शुक्रवारपेठेतील मंडईत फुले विक्रत्यांकडे प्रतिनिधीने पिशवीची मागणी केली. या वेळी त्याने ‘पिशवी नका मागू ताई’ असे उत्तर दिले. ‘पिशवी नसेल, तर फुले नको,’ असेही मुद्दाम प्रतिनिधीने म्हटले. त्यावर ‘पिशवी नाही म्हणून फुले नाही असे नका करू’, असे सांगत एक पिशवी काढत त्यात लगेच फुले दिली. हेच अनुभव  भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून ग्राहक बनून गेलेल्या ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला आले.  

घटना क्रं 4  जंगली महाराज रस्ता येथे एक महिला  कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या 50 मायक्रॉनहून कमी जाडीच्या डस्टबीन पिशव्यांचीही विक्री करत असल्याचे दिसले. गेल्या 4-5 महिन्यांपासून मी इथेच या पिशव्या विकत असल्याचे तिने सांगितले.अशाच प्रकारच्या पिशव्या फर्ग्युसन रस्ता परिसरातही विकत असल्याचे आढळून आले.