Tue, Mar 19, 2019 05:29होमपेज › Pune › प्लास्टिकबंदी बचत गटांच्या पथ्यावर

प्लास्टिकबंदी बचत गटांच्या पथ्यावर

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:11AMपुणे : अपर्णा बडे

राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय झाल्यानंतर महिला बचत गटांनी त्यावर पर्याय आणि संधी म्हणून कापडी, कागदी पिशव्या तयार करण्याचा निर्णय घेतला. शहर तसेच उपनगर परिसरातही अनेक महिला बचत गटांकडून या धर्तीवर काम देखील सुरू करण्यात आले आहे.

‘प्लास्टिकबंदी’ नंतर राज्यात प्लास्टिक पिशवी विक्रेते, उत्पादकांसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाऊ लागला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. तर अनेकांनी डोळे विस्फारले आहेत. उद्योजक, व्यावसायिक यांचा या निर्णयाला विरोध असताना बचत गटाच्या महिलांनी याकडे संधी म्हणून पाहत कापडी तसेच कागदी पिशव्या तयार करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. शहरातील विविध महिला बचत गटांच्या वतीने महिलांना या संदर्भात विविध प्रकारच्या कापडी पिशव्या कशा तयार करायच्या, त्याचे सुशोभीकरणासह वेगवेगळ्या आकारातील कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

याबाबत ईको एक्झिस्ट या पर्यावरण संस्थेच्या सदस्य व महिला बचत गट चालविणार्‍या मनिषा घुटमन म्हणाल्या, मांजरपाट कापडापासूनच्या स्वस्त आणि साध्या पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात  आले. मात्र आता यात ग्राहकांच्या गरजेनुसार बटवा, डमरू, झोला असे विविध पर्याय कापडी पिशव्यांमध्ये खुले केले आहेत. किराणा, फळे, भाजीपाला मालासाठी कापडी पिशव्यांची मागणी अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

कापडी बरोबरच कागदी पिशव्या तयार करण्याविषयीही बचत गटाच्या महिलांना सुचविण्यात आले आहे. कागदी पिशव्या बनविणार्‍या उत्कर्ष महिला बचत गटाच्या सविता काळोखे म्हणाल्या, कागदी पिशव्या बनवायला सोप्प्या आणि अधिक आकर्षक असतात. त्यामुळे महिलांनी या प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत हा नवा लघु उद्योग सुरू करण्यासाठी होकार दिला आहे.

इको एक्झिस्ट महिला बचत गटात काम करणार्‍या सुवर्णा कद्रे म्हणाल्या अनेकींनी कमी दरात चांगले कापड कुठे मिळेल, याची चाचपणी सुरू केली. तर काहींनी टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी घरातील काठ-पदराच्या सुती साड्या तसेच अन्य कापडापासून आकर्षक पिशव्या तयार करण्यास सुरुवात केली आहे. तूर्तास या तयार पिशव्या  प्रायोगिक तत्त्वावर जवळच्या किराणा मालाच्या दुकानात, स्टॉल अशा ठिकाणी विक्रीस ठएवल्या जात आहेत. मात्र या पिशव्यांना मोठी बाजारपेठ मिळावी यासाठी महिला बचत गट चाचपणी करत आहेत. टिकाऊ पिशव्यांसाठी अनेकांनी कागदीपेक्षा कापडी पिशव्या तयार करण्याकडे कल ठेवला आहे. मात्र व्यापार्‍यांच्या गरजा लक्षात घेता कापडी पिशव्यांवर व्यापारी लोगोसह अन्य तपशील टाकत पिशव्या अधिक आकर्षक करीत असल्याचेही घुटमन म्हणाल्या.

‘टेक्नोसॅव्ही’ महिला बचत गट

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून महिलांनी ग्रुप तयार केले असून त्या माध्यमातून महिला कागदी व कापडी पिशव्यांच्याा उत्पादनाची माहिती देत आहेत.या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात पिशव्यांसाठी मागणी येत आहे. मात्र महिलांनी मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी  प्रयत्न करावे.