Tue, Jul 23, 2019 02:20होमपेज › Pune › ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीच काय?

ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीच काय?

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 12:37AMपुणे : नरेंद्र साठे 

प्लास्टिक ग्रामीण भागात सर्रास वापरण्यात येते हे वास्तव आहे. कारवाईच्या आणि दंडाच्या संदर्भात संभ्रमावस्था असल्याने कारवाई ढेपाळली आहे. पुण्यातून पालखी सोहळा जाणार असल्याने त्यावेळेत कारवाई केली नव्हती. मात्र, पालखी सोहळा संपून देखील अद्याप ग्रामीण भागात कारवाई पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. यात आणखी भर म्हणजे, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे कारवाईची अद्ययावत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्लास्टिक बंदीच काय झालं? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून ग्रामीण भागात झालेल्या कारवाईचा अहवाल अद्यापपर्यंत पूर्णपणे घेतलेला नाही. काही तालुक्यांमध्ये कारवाई झालेली आहे, मात्र त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही. राज्यातील प्रत्येक गाव प्लास्टिकमुक्त व्हावे, यासाठी शासनाने प्लास्टिक बंदीचा आदेश काढला आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये ग्रामीण प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेकडून कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांना सूचना करून कारवाईचे आदेश देण्यात आले. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. यांनी गावपातळीवर कारवाई सुरू केली अथवा नाही, याची माहिती जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने घेतली नसून अद्याप माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात येते. सुरुवातीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली, जनजागृती आणि कारवाईला सुरुवात केली. मात्र, काही दिवसांतच ही कारवाई थंडावली, परिणामी व्यावसायिक बिनधास्त झाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्लास्टिकबंदी अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये मागील एक महिन्यात एकही कारवाई झाली नसल्याचे समोर आले. 

व्यावसायिकांचे फावतेय...

वारीच्या काळात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने दरम्यान प्लास्टिक बंदीच्या संदर्भातील कारवाई झाली नाही. परंतु आता पालखी सोहळा संपन्न होऊन देखील कारवाईला वेग येत नसल्याने व्यावसायिकांचे फावत आहे. नागरिकांकडून देखील सर्रास प्लास्टिकचा वापर होत असल्याने प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीसाठी कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.