Thu, May 23, 2019 05:09होमपेज › Pune › प्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’

प्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 1:32AMपुणे : प्रतिनिधी

प्लास्टिक बंदीवरील कारवाई सध्या थंडावली असली तरी, येत्या 2 ऑक्टोबरनंतर मात्र ती पुन्हा सुरू होणार आहे. तुमच्याकडे प्रक्रिया होऊ न शकणार्‍या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर, तुम्हाला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल आणि यामध्ये दोषी आढळणार्‍यांना 5 हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड आणि प्रसंगी कारावासदेखील होऊ शकतो, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी बुधवारी दिली.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने धायरी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी बैठकीत त्यांनी प्लास्टिकबंदीविषयी व्यापार्‍यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी सिंहगड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, उपाध्यक्ष सोमाराम राठोड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका राजश्री नवले, विलास पोकळे, नवनाथ सोमसे, उमेश यादव, अमोल काशीद, हुकमाराम चौधरी आदी उपस्थित होते. 

प्रक्रिया होऊ न शकणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांनी त्यांच्याजवळील किरकोळ विक्रेत्यांकडे जमा कराव्यात आणि विक्रेत्यांनी त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या 2 ऑक्टोबरपूर्वीच महापालिकेकडे जमा कराव्यात, असे आवाहन उपायुक्त जगताप यांनी यावेळी केले. तसेच, दुधाच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिक पिशव्या पुन्हा परत मिळविण्यासाठी यंत्रणा उभारण्यासंदर्भात काय करता येईल, याचाही विचार सर्व दुकानदारांनी करावा, असेही उपायुक्त जगताप यांनी यावेळी सांगितले.पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने प्लास्टिक जमा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली असून जमा झालेल्या प्लास्टिकमधून ड्रमसारख्या वस्तु तयार केल्या जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी यावेळी दिली. 

वर्गणीसाठी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा : ज्योती गडकरी

वर्गणी हा ऐच्छिक विषय आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात वर्गणीसाठी कोणी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सिंहगड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे गुन्ह्यांना आळा बसतो. शिवाय गुन्ह्यांच्या तपासात त्याची मोठी मदत होते. त्यामुळे सर्व दुकानदार व विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.