Thu, Jun 20, 2019 14:44होमपेज › Pune › पुण्यात प्लास्टिकमुक्ती...शक्यच नाही..!

पुण्यात प्लास्टिकमुक्ती...शक्यच नाही..!

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:58PMपुणे : पांडुरंग सांडभोर

प्लास्टिकबंदीचा निर्णय घेताना राज्य सरकारने ब्रॅन्डेड पॅकेटना सुट दिली आहे. पुण्यात एकूण निर्माण होणार्‍या प्लास्टिक कचर्‍यापैकी निम्मा कचरा ब्रॅन्डेड पॅकेटचा असल्याची नोंद महापालिकेनेच केलेल्या सर्व्हेमध्ये झाली आहे. धक्कादायक म्हणजे या प्लास्टिकचा पुनर्वापरही होत नसल्याने, पुणे कधीच प्लास्टिकमुक्त होणार नसल्याचे स्पष्ट होते आहे. 

महापालिकेशी सलग्न असलेली ‘स्वच्छ’ ही कचरा वेचकांची सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या कचरा वेचक कामगारांमार्फत शहरातील तब्बल 6 लाख 20 हजार घरांमधून आणि 1 हजार वस्तींमधून दररोज कचरा गोळा केला जातो. या कचरा वेचकांमार्फत या संस्थेने शहरातील प्लास्टिकबाबत महिनाभरापुर्वी एक सर्व्हे केला आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जरी प्लास्टिकवर बंदी घातली असली, तरी ती कशी कुचकामी ठरणारी आहे, हे त्यातून समोर आले आहे. या सर्व्हेनुसार शहरात एकूण जो कचरा गोळा होतो, त्यात 8 टक्के म्हणजेच 128 टन इतका प्लास्टिकचा कचरा गोळा होतो. त्यामधील केवळ पन्नास टक्के प्लास्टिकचा वापर पुनरनिर्मितीसाठी होतो. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे 52 टक्के ब्रॅन्डेड पॅकिग वस्तुंचे, म्हणजेच अनेक थर असलेल्या प्लास्टिक असल्याचे आढळून आले आहे. त्याचा पुर्ननिर्मितीसाठीही वापर होत नाही, त्यामुळे कचरा वेचकांकडूनही ते गोळा केला जात नाही. त्यामुळे ते पडून राहते. धक्कादायक म्हणजे या प्लास्टिकवर बंदी नाही. त्यामुळे शहरातील पन्नास टक्के प्लास्टिक हे कचर्‍यात कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, प्लास्टिकमुक्तीच्या घोषणेला यामुळे खो बसत आहे. या ब्रॅन्डेड वस्तुंमध्ये प्रामुख्याने 86 टक्के खाण्याचे पदार्थांचे असून 8 टक्के व्यक्तिगत उत्पादने आणि 6 टक्के घरगुती वापरातील वस्तुंचे असल्याचे समोर आले आहे. 

खाद्यपदार्थचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा

एकूण प्लॅस्टिक कचर्‍यात 86 टक्के प्रमाण हे खाद्य पदार्थांच्या पैकेजिंग असल्याचे आढळून आले आहे. यात प्रामुख्याने बिस्किटे, केक व तत्सम  बेकरी पदार्थ, चाकलेट, मिठाई, चिप्स, आयते खाद्य पदार्थ, सॉस इ. चा समावेश आहे.  तर 8 टक्के वैयक्तिक  वापराच्या वस्तूंच्या पॅकिंगमध्ये साबण, टूथपेस्ट, शांपू, डायपर, सनिटरी नपकिन, औषधांचे यांचा समावेश आढळून आला आहे. उर्वरीत 6 टक्क्यांमध्ये कचरा घरगुती वापराच्या वस्तूंचा समावेश असून, त्यात कपडे व भांडी स्वच्छता करण्यांच्या वस्तुंचा समावेश आहे.

भारतीय वस्तुंच्या कचर्‍याचे प्रमाण अधिक

शहरात जो एकूण प्लॅस्टिक कचरा तयार होतो, त्यात 87 टक्के प्लास्टिक कचरा हा भारतामधील उत्पादित वस्तुंचा तर उर्वरीत 13 टक्के आंतरराष्ट्रिय ब्रँन्डच्या वस्तुंच्या कचर्‍याचा असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.