Thu, Apr 25, 2019 07:50होमपेज › Pune › प्लॅस्टिक बंदीची कारवाई बेकायदेशीर!

प्लॅस्टिक बंदीची कारवाई बेकायदेशीर!

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

पॅकिंगच्या वस्तूंवरही चुकीच्या पद्धतीने दंड आकारून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची बेकायदेशीरपणे अंमलबजावणी केल्याच्या निषेधार्थ किरकोळ व्यापार्‍यांनी शनिवारी (ता. 23) उत्स्फूर्तपणे दुकाने बंद केली. ही कारवाई हुकुमशाही पद्धतीने होत असल्याचे लक्षात येताच शहरातील सिंहगड रस्ता, कोथरुड, सातारा रस्ता, मंडई, वडगावशेरी, हडपसर आदी भागातील दुकाने कारवाई सुरू होताच बंद झाली, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी कायद्याचे स्पष्टीकरण करताना पॅकिंगच्या वस्तुंवर कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते. वास्तवात शनिवारपासून कायदा लागू झाल्यानंतर व्यापार्‍यांवर पॅकिंगच्या वस्तू असल्याचे सांगून दंडाच्या पावत्या देण्यात आल्या. व्यापार्‍यांनी प्लॅस्टिक बंदीचे स्वागत केले आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची घोषणा झालेली नव्हती. मात्र, आजची कारवाई हुकुमशाही पद्धतीने होत असल्याचे पाहून व्यापार्‍यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. ही कारवाई अशीच राहणार असेल तर, 5 हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड भरणे सामान्याला परवडणार नाही.