Sat, Mar 23, 2019 12:35होमपेज › Pune › प्लास्टिक आधारकार्डच्या नावावर खोटे मेल

प्लास्टिक आधारकार्डच्या नावावर खोटे मेल

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 12:51AMपुणे : देवेंद्र जैन 

सध्या देशात आधारकार्डवरून काहूर माजलेले असताना, याच गोष्टीचा फायदा घेत काही देशविघातक शक्ती व सायबर हॅकर यांनी डोके वर काढल्याचे आढळून येत आहे. देशातल्या करोडो नागरिकांना  opsr_22catalystwebtrendz.co.in या नावाने मेल पाठवून या हॅकर अथवा फसवणूक करणार्‍या टोळ्या आधारकार्ड मागवून त्यांना 30 रुपये ऑनलाईन भरून प्लास्टिकचे आधारकार्ड देण्याचे आमिष दाखवत आहेत. 

नागरिकांना सदर मेल उघडल्यावर CSC e-Govern NCE Services India Ltd MAZA AADHAAR असे छापल्याचे दिसते, जेणेकरून नागरिकांना ही कंपनी सरकारी असल्याचे वाटते. तसेच त्यात त्यांनी फक्त 30 रुपयांत आपले आधारकार्ड  प्लास्टिकमध्ये बदलून मिळेल असे म्हटले आहे व त्याकरिता आपण आपले कार्ड स्कॅन करून 30 रुपये आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डवरून  भरायचे आहेत व त्यानंतर आपले प्लास्टिकचे आधारकार्ड आपण दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल, असे  सांगितले आहे.

याबाबत दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने UID-I  कडून माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली. सदर मेल सायबर फसवणूक करणारे अथवा देशविघातक शक्तींकडून केला आहे. सदर मेलच्या मजकुराला फसून जो कोणी 30 रुपये भरेल त्याच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा लगेचच गैरवापर नक्की होणार व मिळवलेल्या कार्डवरील माहितीचा वापर काही दशहतवादी कारवायांत होण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने व्यक्त केली आहे. 

याबाबत आधारच्या UID-I या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मुख्य वरिष्ठ अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सदर मेल पूर्णपणे खोट्या आहेत व नागरिकांनी अशा आधार प्लास्टिक कार्डच्या आमिषाला बळी पडू नये व आपल्या कार्डची माहिती कोणालाही देऊ नये, असे ‘पुढारी’ला सांगितले. सध्या देशविघातक शक्तींकडून सरकारच्या वेगवेगळ्या आस्थापना व कार्यालयांच्या नावाने खोट्या वेबसाईट सुरू करण्यात आल्या आहेत व त्याच्या माध्यमातून नागरिकांना करोडो रुपयांना फसवले जात आहे. याकरिता नागरिकांनी सरकारी वेबसाईटचाच वापर करावा. कारण सरकारी वेबसाईटवर नागरिकांची कुठलीही वैयक्तिक माहिती अथवा त्यांच्या क्रेडिट व डेबिट कार्डची माहिती घेतली जात नाही.

दैनिक पुढारीच्या वाचकांनी आधार  प्लास्टिक कार्डच्या मेलला बळी पडू नये व आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती मेलवर भरू नये, तसेच ‘पुढारी’च्या बातम्यांची लिंक जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचवण्याचे आवाहन केले आहे.