Thu, Aug 22, 2019 08:17होमपेज › Pune › राज्यातील हजार गावांचा नियोजनबद्ध विकास 

राज्यातील हजार गावांचा नियोजनबद्ध विकास 

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 10 2018 11:48PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

राज्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक गावे विकासापासून वंचित आहेत. त्या गावांचा विकास करण्यासाठी शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकार, उद्योगपती आणि मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक यांच्या माध्यमातून वंचित गावांचा नियोजनबद्ध विकास केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी बुधवारी (दि.10) पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या  ग्रामपरिवर्तकांचे यशदामधमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. त्यावेळी परदेशी बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, अजय सावरीकर आदी उपस्थित होते.

परदेशी म्हणाले की, राज्यातील गावांचा विकास मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली करण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू केली आहे. यामध्ये पहिल्या टप्यात 150 विद्यार्थ्यांची परिक्षा घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असून प्रशिक्षणानंतर ग्रामपरिवर्तकांना प्रत्यक्ष गावात जाऊन काम करावे लागणार आहे. राज्यातील उद्योगपतींनी एक हजार खेड्यांचा संकल्प केला असून यासाठी ‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फौंडेशन’ नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारचा पन्नास टक्के आणि उद्योगपतींचा पन्नास टक्के हिस्सा आहे.

ग्रामपरिवर्तकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पंतप्रधान आवास योजना, पिण्याची पाण्याच्या योजना, कौशल्य विकास कार्यक्रम, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी योजनांवर विकासाठी भर दिला जाणार आहे. या योजनेमुळे गावांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील गावे

पहिल्या टप्प्यात राज्यातील 450 गावांचा विकास केला जात आहे. तीन वर्षांत 1 हजार गावांचा नियोजनबद्ध विकास होईल. पहिल्या टप्प्यात रायगड, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, नांदेड, बीड, परभणी, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतील मागासगावांचा समावेश आहे.