होमपेज › Pune › प्रदूषण नियंत्रणासाठी पुण्यात योजना

प्रदूषण नियंत्रणासाठी पुण्यात योजना

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी 

तरंगत्या धुलीकणांमुळे पुणे शहरात निर्माण झालेले प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तज्ज्ञांनी तयार केलेला कृती आराखडा राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. त्या आधारावर लवकरच प्रकल्प राबविला जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नागपूर येथे पत्रकारांना दिली.पुण्यातील हवेमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रमाणाबरोबरच तरंगणारे धुलीकणही वाढले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वारगेट, कर्वेरोड व नळस्टॉप या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे नुकतेच मोजमाप केले. त्यामध्ये वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे, ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली असून, तातडीचा उपाय म्हणून, डिझेलमधील सल्फरचे प्रमाण कमी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानपरिषदेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. अनंत गाडगीळ, नीलमताई गार्‍हे, धनंजय मुंढे, हेमंत टकले आदींनी या चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर बापट पत्रकारांशी बोलत होते. पुण्याला आता ‘भारत स्टेज फोर (खत) पातळीचे पेट्रोल व डिझेल पुरविले जात आहे. त्याशिवाय मध्यम पल्ल्याच्या उपाययोजनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चालना, सीएनजीच्या वापराला प्रोत्साहन, अर्बन स्ट्रीट डिझाईन, खड्डे विरहित रस्ते, यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याची अंशत: अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

सीएनजीच्या वापरात वाढ

सीएनजीवर चालणार्‍या ऑटोरिक्षांना अनुदान देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. पुण्यात सुमारे पंधरा हजार रिक्षांना प्रत्येकी बारा हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात आले आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईन तयार करून, त्यामध्ये सायकल ट्रॅक, सेवा रस्ता, ‘स्टॉर्म वॉटर ड्रेनस्’, याचा समावेश आहे. रस्ते सुधार प्रकल्पही तयार करण्यात आला. खड्डेविरहित रस्त्यांसाठी ‘स्पेशल रोड मेन्टेनन्स व्हॅन’ घेण्यात आल्या. त्यांची संख्या लवकरच तिपटीने वाढविली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत सीएनजीचा वापर 20 हजार वरून 80 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात आला आहे.

शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न

शहरात मेट्रो सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 16.5 किमी आणि 14.5 किमी अशा दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. याशिवाय रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी छत्तीस ठिकाणी हिरवळीची वाहतूक बेटे तयार होत आहेत. पुण्यातील झाडांची संख्या आजमितीला अडतीस लाख आहे. ती दुप्पट करण्याचा शासनाचा मनोदय आहे. जीआयएस प्रणालीद्वारे वृक्षांची गणना केली जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर, स्मशानभूमीत विद्युत दहिनीचा वापर आदी क्षेत्रात काम केले जाणार आहे.