Wed, Mar 20, 2019 08:56होमपेज › Pune › पुण्यात जन्मलेल्या रोलबॉलने मिळवले ‘गिनिज बुक’मध्ये स्थान

पुण्यात जन्मलेल्या रोलबॉलने मिळवले ‘गिनिज बुक’मध्ये स्थान

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 07 2018 11:22PMपुणे ः प्रतिनिधी

पुण्याने जगाला दिलेल्या रोलबॉल या आगळ्यावेगळ्या खेळाचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (आरबीएफआय) आणि आंतरराष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन (आयआरबीएफ) यांनी सलग चोवीस तास रोलबॉलचा सामना खेळवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे, अशी माहिती रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे (आरबीएफआय) अध्यक्ष विनित कुबेर, रोलबॉल खेळाचा शोध लावणारे क्रीडा मार्गदर्शक राजू दाभाडे आणि प्रशिक्षक चेतन भांडवलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

तीन तास चालू राहिलेला जोराचा पाऊस, दुपारच्या वेळी पडलेले कडक ऊन यातील कशाचीही तमा न बाळगता खेळाडूंनी रोलबॉलचा हा सामना सलग 24 तास रंगवला. पुणे आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून आलेल्या तब्बल 309 रोलबॉल खेळाडूंनी सामन्यात भाग घेऊन रोलबॉल सामना खेळणार्‍या सर्वाधिक खेळांडूंचाही विश्‍वविक्रम नोंदवला. अशा पद्धतीने रोलबॉल या खेळाच्या नावावर दोन विश्‍वविक्रमांची भर पडली आहे. 

या विक्रमी सामन्यासाठी 309 खेळाडूंचा सहभाग असलेले ‘इंटरनॅशनल रोलबॉल फेडरेशन’ आणि ‘रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ असे दोन संघ करण्यात आले आणि 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून 19 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग रोलबॉलचा सामना खेळला गेला. यात मुले व मुली अशा दोहोंचा सहभाग होता. 

संततधार अशा 3 तास सुरू राहिलेल्या पावसामुळे या खेळात व्यत्यय येईल की काय अशी शंका निर्माण झाली, परंतु गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या नियमानुसार सामना थांबवता येणार नसल्यामुळे पावसातही खेळाडूंनी खेळ सुरूच ठेवला. दुसर्‍या दिवशी दुपारी पडलेले कडक ऊन ही सामना सुरू ठेवण्यातील आणखी एक आव्हानात्मक गोष्ट होती. 
परंतु त्यावरही खेळाडूंनी मात केली. उन-पावसांत आणि रात्रीच्या वेळी लहान वयाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांची जागा मोठ्या खेळाडूंनी घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत खेळ थांबू न देता विश्‍वविक्रमास गवसणी घातली.

या सामन्यात ‘इंटरनॅशनल रोलबॉल फेडरेशन’ने ‘रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’वर 336-328 अशा गुणांनी मात केली. या विश्‍वविक्रमासाठीच्या सामन्यात 11 वर्षांखालील, 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि त्याहून मोठ्या खेळाडूंचाही सहभाग होता. यात महाराष्ट्रातील 42 मुले आणि 16 मुली होत्या. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, तमिळनाडू, पाँडिचेरी, केरळ, ओडिशा, आसाम या सर्व ठिकाणांहून रोलबॉल खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक आले होते.

याबाबत क्रीडा मार्गदर्शक दाभाडे म्हणाले की, आता या खेळास चांगली लोकप्रियता प्राप्त झाली आहे. जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. रोलबॉल या खेळात खेळाडूंच्या कौशल्याबरोबरच त्यांचा वेग आणि शरीराचे संतुलन राखण्याची क्षमता या सर्वच गोष्टींचा कस लागतो. त्याबरोबरच या खेळात विजयासाठी ’टीम वर्क’ फार महत्त्वाचे ठरते.