Mon, Jul 22, 2019 02:50होमपेज › Pune › तिसर्‍याच दिवशी टेस्ट ट्रॅक अनफिट

तिसर्‍याच दिवशी टेस्ट ट्रॅक अनफिट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : नवनाथ शिंदे

वाहन योग्यता तपासणीसाठी (फिटनेस) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदाराने तयार केलेल्या वाहन टेस्ट ट्रॅकवर तिसर्‍याच दिवशी खड्डे पडले आहेत; त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचा कामातील हलगर्जीपणा आणि भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान ट्रॅक बांधणी सुरू असताना कामाचा दर्जा तपासणीबाबात सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराशी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केला आहे का, असा प्रश्‍न ट्रॅकच्या उभारणीवरून दिसून येत आहे.

दिवे गावालगत असलेल्या झेंडेवाडी परिसरातील आरटीओच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या फिटनेस टेस्ट ट्रॅकचे काम निविदाप्रमाणे झाले की नाही याबद्दल शंका निर्माण होत आहे. उच्च न्यायालयाचा आदेशाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरटीओला ट्रॅक लवकर उपलब्ध करून देण्यासाठी घाई करण्यात आली. त्यामुळे ठेकेदाराकडून वाहन टेस्ट ट्रॅकच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत थातुर-मातुर काम करण्यात आले आहे. त्यामुळे ट्रॅकवर वाहनांची तपासणी करताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहन टेस्ट ट्रॅकच्या सुरुवातीला असलेला मुरुमाचा थर खचू लागला आहे; तर मुरुमाचे पिचिंग व्यवस्थित न झाल्याने 20 ते 30 मीटर अंतरावर जागोजागी मुरूम एकत्रित होत आहे. 

बे्रक टेस्टसाठी उभारण्यात आलेल्या धावपट्टीच्या सुरुवातीलाच खड्डे पडल्याने वेगाने येणार्‍या छोट्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रॅकवर अवघ्या 8 ते 10 फुटांच्या अंतरावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांची बे्रक तपासणी करण्यापूर्वी फिटनेस ट्रॅकची फिटनेस तपासणी झाली नसल्याबद्दल वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एक तो देर से आये और दुरुस्त भी ना आये 

वाहनांची फिटनेस तपासणी मॅन्युअली करताना त्रुटी राहत असल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे वाहन ट्रॅकशिवाय फिटनेस तपासणी बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. अखेर ट्रॅकअभावी 1 नोव्हेंबरपासून फिटनेस तपासणी बंद करण्यात आली. दरम्यान पुणे आरटीओच्या 250 मीटर ट्रॅक उभारणीची वर्क ऑर्डर नोव्हेंबर 2016 मध्ये काढण्यात आली होती; तर शासनाकडून काम सुरू करण्यासाठी मार्च 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग सासवड निधी वर्ग केला होता.

ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे वाहन टेस्ट ट्रॅकचे काम रेंगाळले होते. 250 मीटर ट्रॅकचे काम वर्षभरात पूर्ण करण्यासाठी चालढकल करण्यात आली होती. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामाला गती देण्यात आली. त्यामुळे अवघ्या एक ते दोन महिन्यात कामाच्या निविदाप्रमाणे पिचिंग, मुरूम थर, डांबर थराचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे वाहन टेस्ट ट्रॅकवर बे्रक तपासणी करताना धोका निर्माण झाला आहे.