Thu, Jan 17, 2019 01:52होमपेज › Pune › पिस्तुलाच्या धाकाने लुटणार्‍यांना अटक

पिस्तुलाच्या धाकाने लुटणार्‍यांना अटक

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:52AMपुणे : प्रतिनिधी

ऑनलाईन कॅब बुक करून शहरात त्यात फिरल्यानंतर वारजे माळवाडी भागात नेवून चालकाला पिस्तूलाचा धाक दाखवून कॅब आणि रोकड पळविणार्‍या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत साडे सहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सुनील लक्ष्मण गवळी (वय 32, रा. धायरी गाव) आणि अंगद महादेव गवळी (वय 27, रा. शांतीनगर, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दत्तवाडी पोलिस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. शहरात घरफोड्या, लुटमारीबरोबरच वाहन चोरीच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. त्यामुळे सराईत गुन्हेगारांबरोबर या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. दरम्यान दत्तवाडी पोलिस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कर्मचारी सुधीर घोटकुले यांना माहिती मिळाली की, दोन व्यक्ती नवीन रिक्षा घेऊन पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ थांबल्या असून, रिक्षा चोरीचीच असावी. त्यानुसार, बातमीची खातरजमा करण्यात आली.

चोरीची रिक्षा असल्याची खात्री झाल्यानंतर परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक अनिल डफळ, कर्मचारी रवींद्र फुलपगारे, महेश गाढवे यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, दोघांनी रिक्षा चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी एका कॅब चालकाला पिस्तूलाच्या धाकाने लुटल्यासह एकूण दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. गेल्या आठवड्यात ऑनलाईन कॅब बुक करून बोलविले. तो आल्यानंतर दोघे त्याला घेऊन शहरात फिरले. 
त्यानंतर वारजे माळवाडी भागातील नदी पात्रात नेले. त्याठिकाणी पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 8 हजाराची रोकड, मोबाईल, फोर्ड पिगो कार पळविल्याचे सांगितले. त्यानुसार, आरोपींकडून एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. तीन गुन्ह्यातील 6 लाख 53 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.