Thu, Apr 25, 2019 08:11होमपेज › Pune › डॉक्टर कर्मचाऱ्यांन विना रूण्ग वाऱ्यावर

डॉक्टर कर्मचाऱ्यांन विना रूण्ग वाऱ्यावर

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 10:30PM

बुकमार्क करा

 

पिंपरी : प्रदीप लोखंडे

‘आमच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ केली, रुग्णालयात दाखल करून घेतले नाही, डॉक्टर व कर्मचारी उद्धट बोलतात, रात्रीच्या वेळी डॉक्टर नसतात,’ यांसारख्या अनेक तक्रारी रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम)बाबत करत आहेत. डॉक्टरांसह कर्मचारीच अधिकार्‍यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. अधिकार्‍यांमध्येही अनेकवेळा वादाचे खटके उडत आहेत. त्यामुळे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय सतत विविध कारणांनी  चर्चेचा विषय ठरते. महापालिकेच्याच एका डॉक्टराकडून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना दमदाटी करून धमकाविण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) घडला आहे. त्याची तक्रार महापालिका आयुक्तांपर्यंतही पोचली असून, डॉ. देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे समोर आले आहे. दोन वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये असा वाद झाला, तर रुग्णसेवा व्यवस्थित देणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. 

भांडण, मारामारीच्या घटनांमध्ये गंभीर जखमी रुग्णांना जेव्हा ‘वायसीएम’मध्ये नेले जाते, तातडिक विभागात दाखल केले जाते, त्या वेळी दोन ते अडीच तास रुग्णास उपचाराच्या प्रतीक्षेत ठेवले जाते. तातडीने उपचार करण्याची गरज असताना, मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. रात्रीच्या कामाची सर्व काही जबाबदारी ‘सीएमओ’वर सोपवून रुग्णालय व्यवस्थापन झोपी जाते. रात्री अत्यंत गरज असताना, एकही सर्जन उपलब्ध होत नाही. कधी भूलतज्ज्ञ, तर कधी दुसरेच शिकाऊ डॉक्टर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. ‘वायसीएम’ रुग्णालयाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही. महापालिका आयुक्तांना रुग्णालयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. प्रमुख वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षक यांची सुधारणा घडवून आणण्याबद्दल उदासीनताच दिसते आहे. 
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.