Sat, Jan 19, 2019 03:33होमपेज › Pune › देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारणीत मराठी तरुणांचे बळ

देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारणीत मराठी तरुणांचे बळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी ःमिलिंद कांबळे

 देशभरातील विविध ठिकाणी दिवस-रात्र अभिमानाने फडकणार्‍या भव्य आकाराच्या तिरंगा ध्वजासाठी तब्बल 50 ते 107 मीटर उंचीचे स्तंभ उभारण्याचे जिकिरीचे कार्य पिंपरी-चिंचवड शहरातील तरुण करीत आहेत.  

पिंपरी गावातील 32 वर्षीय परेश कुदळे व 43 वर्षीय गणेश निकम या तरुणांची टीम देशभरात मोठ्या उंचीचे ध्वजस्तंभ उभारण्याचे काम चपळाईने करते. या टीमने तब्बल 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ नुकताच निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानात उभा केला आहे. कुदळे, निकम यांच्यासह पराग कुदळे, विष्णू मगर, गणेश अवचिते, अक्षय खंडागळे, अभिषेक मुंढे, श्रीकांत दाभाडे हे काम सराईतपणे करतात.
बजाज इलेक्ट्रिकच्या वतीने हे खांब उत्पादित केले जातात. ते प्रत्यक्ष जागेवर नेऊन सुरक्षितपणे उभे करून दिले जातात. निगडीतील स्तंभाचे काम चार दिवसांत पूर्ण करण्यात आले. साडेदहा मीटरचे 12 मेटल शिटचे खांब प्रेसफीट व नटबोल्टने एकमेकांवर जोडण्यात आले. त्याचे एकूण वजन 40 टन इतके होते. ऊन, पाऊस, वारा आणि थंडीचा  परिणाम होऊ नये व गंज चढू नये म्हणून खांबावर विशिष्ट द्रव्याचा थर दिला जातो. 

अधिक उंचीचा एकसलग खांब उभा करण्याचे काम जिकिरीचे असते. वारा आणि वाहतुकीचा त्याला मोठा अडथळा ठरतो. खांबाच्या परिघात कोणीही अनोळखी व्यक्ती येणार नाही, याची दक्षता घेऊन 50 ते 100 टन वजनाच्या अद्ययावत तीन ते चार क्रेनच्या माध्यमातून हे काम केले जाते. निगडीतील स्तंभावर 120 फूट बाय 80 फूट आकाराचा भव्य राष्ट्रध्वज लवकरच फडकणार आहे.