Tue, Jul 16, 2019 09:59होमपेज › Pune › स्वच्छता कार्यशाळेस नगरसेवकांची दांडी

स्वच्छता कार्यशाळेस नगरसेवकांची दांडी

Published On: Jan 01 2018 2:03AM | Last Updated: Dec 31 2017 11:01PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि.30) झालेल्या कार्यशाळेस केेवळ 27 नगरसेवकांनी हजेरी लावली, तर तब्बल 106 नगरसेवकांनी कार्यशाळेस दांडी मारली. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी नगरसेवक उदासीन असल्याचे दिसून आले. स्वच्छ शहर स्पर्धेसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती मोहीम राबवली जात आहे. रॅली व फ्लेक्स लावून स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन महापालिका करीत आहे. त्यास प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल 19 हजारांपेक्षा अधिक लोकांनी ‘स्वच्छता मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड’ केले आहे.

त्या संदर्भात माहिती देण्यासाठी नगरसेवकांची कार्यशाळा चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात शनिवारी झाली. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेस सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी दांडी मारली. महापालिकेत एकूण 128 व स्वीकृत 5 असे एकूण 133 नगसेवक आहेत. त्यांपैकी केवळ 27 नगरसेवक कार्यशाळेस उपस्थित होते. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ शहर अभियानासाठी नगरसेवक किती उत्साही आहेत, याचे दर्शन झाले. 

कार्यशाळेत महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहर प्रथम स्थानी आणण्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकार्‍यांसह नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौरांनी केले. स्पर्धेचे सर्वेक्षण दि. 4 जानेवारीपासून महिनाअखेरपर्यंत होणार आहे. त्यासाठी केंद्राची समिती शहरात येणार आहे. स्पर्धेत अधिक गुण मिळविण्यासाठी सर्वांनी ‘स्वच्छता मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड’ करण्याचे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले. कार्यशाळेस उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, मनसे गटनेते सचिन चिखले, क्षेत्रीय समिती अध्यक्ष केशव घोळवे, अश्‍विनी जाधव, भीमाबाई फुगे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, तुषार कामठे आदी उपस्थित होते.