Thu, Mar 21, 2019 11:05होमपेज › Pune › कामगारांना प्रमाणपत्राची जाचक अट

कामगारांना प्रमाणपत्राची जाचक अट

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:13AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पुण्यातील समाज विकास अधिकार्‍यांनी बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यासाठी जाचक अट घातली आहे. एकाच ठिकाणी नव्वद दिवस कामाला असल्यास बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा नियम आहे; मात्र कामगार कोणत्याही एका ठिकाणी कायमस्वरूपी काम करत नाहीत. अनेक प्रकल्पांवर कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करत असतात. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. या प्रमाणपत्राअभावी बांधकाम कामगार नोंदणीच रखडली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील बांधकाम कामगारांना शासनाकडून मिळणार्‍या लाभापासूनही वंचित राहावे लागत आहे.
महापालिका, नगरपरिषदांमध्ये काम करणार्‍या कामगारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणी प्रमाणपत्र देऊ शकते.

त्यामुळे 31 डिसेंबर 2015 पर्यंत महापालिका व नगर परिषदांनी स्थानिक नाका कामगारांची नोंदणी करण्याची धडक मोहीम राबविण्यात यावी, असे आदेश नगर विकास विभागाने काढले होते. या नोंदणीसाठी बांधकाम कामगाराने किमान नव्वद दिवस कोणत्याही एका ठिकाणी काम करणे अपेक्षित आहे; मात्र अशा कामगारांची संख्या उपलब्ध होत नसल्याने त्यांची नोंदणी होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.  शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पावर स्थानिक मजूर काम करतात. कामगारांची संख्या अधिक असताना प्रत्यक्ष नोंदणीत मात्र कमी संख्या दाखविली जात असल्याचा आरोप कामगार संघटना करत आहेत.

त्यामुळे या कामगारांना जीवन विमा, वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाच्या सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. कामगारांच्या कल्याणासाठी दर वर्षी 20 कोटींचा निधी महापालिकेकडे जमा होतो. शासनाकडून कामगारांसाठी जीवन विमा, वैद्यकीय सुविधा, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी सवलत योजनांचा लाभ दिला जातो. मात्र अनेक कामगार या योजनेपासून अनभिज्ञच असल्याचे दिसते. याबाबत पुण्याचे समाज विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.