होमपेज › Pune › ग्रामीण महिलांत सॅनिटरी नॅपकीन चा कमी वापर

ग्रामीण महिलांत सॅनिटरी नॅपकीन चा कमी वापर

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 12:40AMपिंपरी : पूनम पाटील 

सध्या सर्वत्र सॅनिटरी नॅपकीनचा वापर करावा याबाबत चित्रपटाच्या व इतर माध्यमांतून जनजागृती केली जात आहे; मात्र ग्रामीण भागातील महिला व युवतींमध्ये लाजाळूपणा, शिक्षणाचा अभाव व जनजागृतीचा कमी प्र्रभाव यामुळे 15 ते 24 वर्षे वयोगटातील जवळपास 63 टक्के युवती मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीनचा वापर करत नाहीत. केवळ 48 टक्के महिलाच या काळात नॅपकीनचा वापर करत आहेत. हे एका अहवालातून समोर आला. ही बाब चिंताजनक असून, महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकीन वापरणे अत्यावश्यक असल्याचे मत स्त्रीरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

राज्य सरकारने ग्रामीण भागातील मुली; तसेच महिला आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु असेे असले, तरी माफक दरात मिळणारे सॅनिटरी नॅपकीन महिला किंवा मुलींनी वापरायचे की नाही याबाबत आजही महिला साशंक आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे मासिक पाळीच्या काळात योग्य ती स्वच्छता राखली जात नसल्याने महिलांना आरोग्यविषयक समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे. 

एका राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 15 ते 24 वयोगटातील 63 टक्के तरुणींकडून जुन्या कापडाचा वापर केला जातो. तिथे शिक्षण जनजागृतीचा अभाव व आर्थिक विषमता यामुळे सॅनिटरी नॅपकीनचा कमी वापर होतो. शहरी भागात महिला मोठ्या प्रमाणात सॅनिटरी नॅपकीन वापरतात. अशिक्षित महिलांच्या तुलनेत शिक्षित महिलांचा सॅनिटरी नॅपकीनचा चारपट अधिक वापर असल्याचे अहवाल सांगतो.

सरकारने ग्रामीण भागात अत्यल्प दरात सॅनिटरी नॅपकीनची सुविधा उपलब्ध केली आहे; परंतु यात सातत्य नसल्याने ऐनवेळेस महिलांची अडचण होते. अशा वेळी जुन्या कापडाला महत्त्व दिले जाते. याशिवाय आरोग्य कर्मचार्‍यांकडे तरुणी व महिला सॅनिटरी नॅपकीन मागताना लाजत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.