Thu, Nov 15, 2018 13:46होमपेज › Pune › पुणे: घर पडणार या भीतीने महिलेची आत्महत्या

पुणे: घर पडणार या भीतीने महिलेची आत्महत्या

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:47AMपिंपरी : प्रतिनिधी

मंगळवारी दुपारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक पिंपळे गुरव परिसरातील एका अनधिकृत बांधकामाची पाहणी करत असताना, आपले बांधकाम पाडले जाणार या भीतीने देवीबाई राम पवार (30, रा. देवकर पार्क पिंपळे गुरव) या महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नागरिक मृतदेह पालिकेवर आणणार असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे पालिकेसमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

काही दिवसांपासून पिंपरी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाकडून पिंपळे गुरव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. मंगळवारी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक सकाळी अकराच्या सुमारास देवकर पार्क येथे कारवाई करण्यासाठी गेले होते. कारवाई सुरू झाली. परिसरातील अनधिकृत बांधकामाची पालिकेचे अधिकारी पाहणी करत होते. 

या वेळी आपल्या घरावरही कारवाई होणार, ही भीती देवीबाई यांच्या मनात आली. आपल्या डोक्यावरचे छप्पर पडणार या नैराश्यातून त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेल्या. त्यांनी तेथून खाली उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचे दोन्ही पाय ‘फ्रॅक्चर’ झाले. दरम्यान, कारवाईच्यावेळी अतिक्रमण पथकातील पोलिसांनी धक्का दिल्याने त्या खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.

प्राथमिक उपचार करून देवीबाई यांना थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळे गुरव येथे आणि रुग्णालय परिसरात नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील मोरया पार्क या पाच मजली इमारतीवर कारवाई सुरू असताना एका रहिवाशाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आज ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.