Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Pune › प्लॅस्टिक कचर्‍यापासून बनविली वॉटरप्रुफ वीट

प्लॅस्टिक कचर्‍यापासून बनविली वॉटरप्रुफ वीट

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:41AM

बुकमार्क करा

पिंपरी : वर्षा कांबळे 

विविध प्रकारचे प्लॅस्टिक नैसर्गिकरित्या नष्ट होण्यासाठी पाचशे ते हजार वर्षाचा कलावधी लागतो. प्लॅस्टिकच्या वस्तूमध्ये गोरगरीबापासून ते उच्चभ्रूपर्यंत प्लॅस्टिकची पिशव्यांचा दैनंदिन वापरात मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि या पिशव्या रिसायकल करणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्यापासून वॉटरप्रुफ वीट तयार करण्याचा अभिनव प्रयोग चिंचवड येथे राहणार्‍या रुतिका केदारी या विद्यार्थिनीने केला आहे. भारतात प्रतिदिवशी 15,342 टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो. यातला फक्त 9,205 टन म्हणजे फक्त 60 टक्के कचर्‍यावर प्रक्रिया होते. यातील 40 टक्के कचरा  प्रक्रिेयविना पडून राहतो. प्रक्रिया होऊ न शकलेला कचरा काही ठिकाणी समुद्रात फेकला जातो किंवा रस्त्यावर जमिनीवर पडून राहतो. यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांची जाडी कमी असल्यामुळे त्या रिसायकल करणे अवघड असते. या समस्येवर उपाय म्हणून या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून विटांची निर्मिती करता येऊ शकते हे या प्रयोगाद्वारे रुतिका हिने दाखविले आहे. 

या विटा प्लॅस्टिक कचर्‍यापासून बनलेल्या असल्यामुळे वॉटरप्रुफ आहे. या विटांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ साध्या मातीच्या किंवा सिमेंटच्या विटांपेक्षा जास्त असते. या विटांची स्ट्रेंथ  120.53 कि. ग्रॅम एवढी आहे.  यापासून रस्ते बनविल्यास पावसाळ्यातील खड्डे कमी होण्यास निश्‍चितच मदत मिळेल. हल्ली रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बरेच अपघात होतात. या विटांवर अ‍ॅसिड आणि पाण्याचा परिणाम होत नसल्याने त्यावर शैवाल तयार होत नाही आणि खड्डे पडत नाहीत. यामुळे  अपघातांचे प्रमाणही यामुळे कमी होईल. ही वीट 150 अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करु शकते. या विटामधून कोणत्याही प्रकारचा प्राणघातक वायू बाहेर पडत नाही. या विटा सर्व प्रकारच्या कचर्‍यापासून बनविता येतात. म्हणूनच प्लॅस्टिक जमिनीवर पडून राहण्यापेक्षा त्यापासून वीटा बनविणे हा एक उत्तम पर्याय  ठरु शकतो. या विटांपासून रस्ते, पादचारी मार्ग, रस्ते दुभाजक, कंम्पाऊंडच्या भिंती वैगेरे बनवू शकतो. तसेच यापासून कुंड्या, कौले देखील बनविता येतात.