Tue, Jun 25, 2019 13:20होमपेज › Pune › स्मार्ट सिटीसाठी निधीची प्रतीक्षा कायम 

स्मार्ट सिटीसाठी निधीची प्रतीक्षा कायम 

Published On: Dec 17 2017 2:20AM | Last Updated: Dec 17 2017 1:33AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी अभियानात तिसर्‍या टप्प्यात समावेश झाल्याने अद्याप निधीची प्रतीक्षा कायम आहे. केंद्रांच्या संबंधित विभागाकडे स्मार्ट सिटी स्थापनेसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे पाठविण्यात आली आाहेत. त्यांची तपासणी झाल्यानंतरच निधीचे वाटप सुरू होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या निधीतून सध्या स्मार्ट सिटीचे कामकाम सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यात डावलेले गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा ‘स्मार्ट सिटी अभियानात समावेश तिसर्‍या टप्प्यात करण्यात आला. नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवडला संधी मिळाली. तशी घोषणा 23 डिसेंबर 2016 ला तत्कालिन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली होती. स्मार्ट सिटीबाबतचा सविस्तर विकास आराखडा 31 मार्च 2017 ला सादर केल्यानंतर शहराची ‘स्मार्ट सिटी’त समावेशाची अधिकृत घोषणा 23 जून 2017 ला झाली.  दरम्यान, केंद्र शासनाच्या सर्व अटीनुसार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या एसपीव्ही कंपनीची स्थापनाही करण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळांची बैठक अद्याप दोन वेळा झाली आहे. 

स्मार्ट सिटीतील पॅनसिटी विकासासाठी एजन्सी नियुक्त केली आहे. तसेच, प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटसाठी तीन एजन्सीचा निविदा शुक्रवारी (दि.16) अखेर प्राप्त झाले आहेत. यासह विविध कामे महापालिकेने सुरू केले आहेत. त्यासाठी अद्याप निधी न मिळाल्याने तो खर्च महापालिका स्वत:च्या खर्चातून करीत आहे. या संदर्भात स्मार्ट सिटीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, यासंदर्भात स्मार्ट सिटीच्या केंद्रीय समितीकडे शुक्रवारी (दि.16) झालेल्या व्हीडीओ कॉन्फरसमध्ये चर्चा झाली झाली. संबंधित विभागाचे सचिव मिश्रा यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी अभियानातील तिसर्‍या टप्प्यात समावेश झालेल्या शहरासाठी अद्याप निधी वाटप सुरू झालेले नाही. एसपीव्ही कंपनी स्थापना, बँक अकाउंट, मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती आदी आवश्यक कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. सदर कागपदत्रे त्यांना पाठविण्यात आल्याचे पोमण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच निधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

असे असूनही अद्याप ‘स्मार्ट सिटी’साठी एका रुपयाचाही निधी प्राप्त झालेला नाही. ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा तयार करणे, एसपीव्ही कंपनीची स्थापना करणे, प्रत्यक्ष कामासाठी  सल्लागार एजन्सी नियुक्ती करणे, ‘स्मार्ट सिटी’साठी कार्यालय उभारणे आदींसह विविध कामे महापालिकेने स्वखर्चातून केली आहेत. दरम्यान, पाच वर्षांत केंद्राकडून 500 कोटी व राज्याकडून 250 कोटींचा निधी मिळणार आहे. महापालिका स्वहिस्सा म्हणून 399 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. ‘स्मार्ट सिटी’साठी एकूण 1 हजार 149 कोटींचा निधी आहे.