Wed, May 22, 2019 16:32होमपेज › Pune › अनेक ठिकाणी दगडफेक; तर वाहनांची मोडतोड

अनेक ठिकाणी दगडफेक; तर वाहनांची मोडतोड

Published On: Jan 04 2018 2:07AM | Last Updated: Jan 04 2018 12:54AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. शाळा-महाविद्यालये, पीएमपीएमएल, एसटी बस, दवाखाने, बँका, एटीएम केंद्रे बंद होती. काही भागात आंदोलकांनी दगडफेक करत वाहनांची मोडतोड केली. दुपारी चारनंतर बंद मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी अकरापासून शहरातून कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे येत गेल्याने मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्या चौकास पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. महापालिकेत हे लोण येऊ नये म्हणून पालिकेचे सुरक्षारक्षक प्रवेशद्वारावर तैनात होते.

आंदोलकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोरील कमला क्रॉस रोडवरील वाहनांना लक्ष्य करत, दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. पिंपरी गावात बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही; मात्र पिंपरी कॅम्प परिसरात आंदोलकांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यास दुकानदारांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे पिंपरी कॅम्प पूर्णपणे बंद होता. साई चौकातून आसवानी भुयारी मार्गातून पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणार्‍या डाल्को मैदान रस्त्यावर आंदोलकांनी दगडफेक केली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास झालेल्या या दगडफेकीमुळे वाहनचालकांनी एकेरी वाहतूक असूनही, इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून जाणे पसंत केले; तसेच स्वामिनाथन रुग्णालयाजवळील वाहनांवरही दगडफेक करून त्यांचे नुकसान करण्यात आले. 

दरम्यान,भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष रामचंद्र माने यांनी परिमंडल तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली. या वेळी एकनाथ कांबळे, संदीप झेंडे, शिवाजी गडगडे, राहुल कांबळे, शेषराव गवळी, बप्पा वाघमारे, जी. के. चाफळकर, भास्कर गायकवाड आदी उपस्थित होते.