Sat, Mar 23, 2019 02:05होमपेज › Pune › वल्लभनगर येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू

वल्लभनगर येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू

Published On: Dec 03 2017 2:38AM | Last Updated: Dec 03 2017 1:58AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी 

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामामध्ये वल्लभनगर, पिंपरी (संत तुकारामनगर) येथील मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले आहे. या स्थानकाच्या पादचारी पुलाचा वापर मेट्रोसह  इतर पादचार्‍यांनाही करता येणार आहे; तसेच दिव्यांग, ज्येष्ठ आणि रुग्णांसाठी लिप्टची सोय असणार आहे, अशी माहिती महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी शनिवारी (दि.2) पत्रकार परिषदेत दिली. 

वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगारात मेट्रोने उभारलेल्या सहयोग केंद्रात झालेल्या परिषदेस पिंपरी-रेंजहिल्स प्रकल्पाचे प्रमुख सुनील म्हस्के, वनाज-रामवाडी प्रकल्पाचे प्रमुख गौतम बिर्‍हाडे आदी उपस्थित होते. डॉ. दीक्षित यांनी सांगितले की, मेट्रो प्रकल्पात येणार्‍या स्थानकांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वल्लभनगर येथे पहिले स्थानक तयार होणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे आणि जिओ टेक्निकल सर्व्हे सुरू झाला आहे. 

स्थानकाजवळ नवीन पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) तयार करण्यात येणार आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक हे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस लेनला जोडण्यात येणार आहे. तसेच, एसटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. सदर पुलाची लांबी 65 मीटर, रुंदी 6 मीटर आहे. स्थानक व पुलाचे डिझाईन स्पेनच्या आयेशा कंपनीने तयार केले असून, बांधकाम एफसीसी व अल्फारा कंपनी करणार आहे. त्याची मुदत 24 महिने आहे. सदर पूल तयार झाल्यानंतरच महापालिकेचा पादचारी पूल काढला जाणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कंपन्यांप्रमाणे स्थानक व पादचारी पुलाचे डिझाईन करण्यात येणार आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटने मेट्रोला जागा देण्यास नकार दिला होता. यासंदर्भात दीक्षित म्हणाले की, अ‍ॅग्रिकल्चर महाविद्यालयाची जागा मिळाल्याने त्या जागेचा आता प्रश्‍न नाही. गरज पडल्यास भविष्यात विचार करू. शहरातील 50 टक्के शासकीय जागा ताब्यात आल्या आहेत.