Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Pune › डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करताय...सावधान

डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करताय...सावधान

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:38AM

बुकमार्क करा

पिंपरी: अमोल येलमार

 ‘कॅशलेस’च्या युगात आणि विशेषतः डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करणार्‍यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे; कारण हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक करून तुमच्या क्रेडिट, डेबिट कार्डचा डाटा, पासवर्ड चोरून तुमच्या खात्यामधून हजारो रुपये परस्पर काढून घेतल्याचे प्रकार समोर आले आहे. अटक केलेल्या महाठगाकडे तब्बल 400  बनावट कार्ड आढळून आली आहेत.

विकी अगरवाल असे या महाठगाचे नाव आहे. नऊ हजार रुपयांचे स्किमर, नऊ हजार रुपयांचे कॉपीरायटर, रीडर आणि पाच हजार रुपयांत पाचशे बनावट डेबिट, क्रेडिट कार्ड एवढेच या महाठगाचे भांडवल आहे. 10-20 हजार रुपयांच्या भांडवलातून त्याने अवघ्या एक वर्षात ग्राहकांना लाखो रुपयांना गंडवले आहे. गणेश पाटील यांचे हिंजवडी चौकात झक्कास नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये कॅशियरची जागा खाली असल्याने त्यांनी सोशल मीडियावर जाहिरात टाकली होती. त्यातून विकीने चौकशी केली व मुलाखत दिली. पाटील यांनी विकी याला 10 दिवस काम पाहून पुढे ठरवू, असे सांगून कामावर ठेवले; मात्र विकीने दुसर्‍याच दिवशी आपल्या कामाची चुणूक ग्राहकांना दाखवण्यास सुरुवात केली. हा प्रकार डोळ्यांत आल्याने त्याला पोलिसांचा पाहुणचार करावा लागला.

विकी याला कामाचे स्वरूप सांगितल्यानंतर तो पहिल्या दिवशी घरी गेला. दुसर्‍या दिवशी कामावर आला. ग्राहकांकडून बिलाचे पैसे घेत असताना काहीतर गडबड करत असल्याचे हॉटेलमधील दुसर्‍या कामगाराच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत मालक पाटील यांना सांगितले. पाटील यांनी हॉटेलमध्ये येऊन त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यांनाही गडबड होत असल्याचे लक्षात येताच, हिंजवडी पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. विकी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हॉटेलमध्ये बिलाची रक्कम देण्यासाठी ग्राहकांनी डेबिट, क्रेडिट कार्ड दिल्यानंतर त्या कार्डचा डाटा स्किमरद्वारे विकी चोरत होता; तसेच ग्राहक पासवर्ड टाकत असताना तो हळूच पाहून तो एका ठिकाणी लिहून ठेवत होता.

रात्री उशिरा घरी गेल्यानंतर या स्किमरमधील सर्व डाटा हा लॅपटॉपमध्ये सेव्ह करत असे. कॉपी रायटरद्वारे हा डाटा त्याने खरेदी केलेल्या बनावट कार्डमध्ये लोड करून ठेवत असे. या बनावट कार्डमध्ये डाटा सेव्ह झाल्यानंतर एटीएममध्ये जाऊन त्या कार्डद्वारे पैसे काढून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याची आणि तो राहत असलेल्या घराची झडती घेतली असता स्किमर, लॅपटॉप, कॉपीरायटर, 400 बनावट कार्ड, डाटा भरलेली 39 कार्ड आढळून आली. विकी याने बनावट कार्ड, स्किमर, कॉपीरायटर हे सगळे ऑनलाईन खरेदी केले आहे. विकी याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो दीड वर्षापूर्वी औंध येथील पेटीओ बेकरीमध्ये कामाला असल्याचे समोर आले. या ठिकाणी त्याने जवळपास 170 ते 180 ग्राहकांचा डाटा चोरलेला आहे. पैकी 30 ते 35 ग्राहकांच्या खात्यांवरून पैसे काढून फसवणूक केलेली आहे. याबाबत कोणी गुन्हा दाखल केला आहे . का, याचा शोध पोलिस घेत आहेत.