Fri, Apr 26, 2019 04:13होमपेज › Pune › पिंपरी वाहतूक पोलिसांचा दंड; वाहनचालक थंड

पिंपरी वाहतूक पोलिसांचा दंड; वाहनचालक थंड

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:49AMपिंपरी ःनरेंद्र साठे

पिंपरीमध्ये वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत नेहमीच वाहतूक पोलिसांवर टीका होते. पिंपरी कॅम्पातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पिंपरी पोलिसांना वारंवार कारवाई करूनदेखील वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयश येते. मात्र, पिंपरी पोलिसांनी पेंडिंग केसच्या कारवाईमध्ये जोरदार वसुली केली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे केलेल्या कारवाईमध्ये पेंडिंग दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये साडेतीन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

पिंपरी वाहतूक पोलिसांच्या टीमने पेंडिंग दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पंधरा दिवस कसून वाहनांची तपासणी केली. यामध्ये 20 हजार 490 वाहनांची तपासणी केली, तर यामध्ये 683 वाहनांवर दंड असल्याचे आढळून आले. या वाहनचालकांकडून 3 लाख 69 हजार 250 रुपये दंड वसूल करण्यात आला. शहरातील चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे नियम तोडणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. घरपोच पावत्या पाठवून दंड भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने चौकांमध्ये वाहनांची तपासणी करून दंड असलेले वाहन आढळून आले की, त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. त्यामुळे दंड चुकवणार्‍यांना आता दंड भरावाच लागत आहे.

 पिंपरी वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक सविता भागवत, सुवर्णा कांबळे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.
पिंपरी शहरामध्ये वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही. अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत वाहने चालवतात. इंदिरा गांधी पुलावर, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उलट दिशेने प्रवास करणार्‍या वाहनचालकांची संख्या मोठी आहे.

त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाईची मोहीम उघडली जात आहे, तरी देखील निर्ढावलेले वाहनचालक उलट दिशेने वाहने दामटवत असतात. यामध्ये दुचाकींचा समावेश आहेच, चारचाकी वाहनचालकही उलट दिशेने वाहने चालवतात. पिंपरी कॅम्प परिसरात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु वाहतूक पोलिस चौकातून गेले की, पुन्हा ‘जैसे-थे’ परिस्थिती होते. यामध्ये पादचार्‍यांना सर्वाधिक त्रास रिक्षाचालकांकडून होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत??.