होमपेज › Pune › उंदराची शिकार, बोका मोकाट

उंदराची शिकार, बोका मोकाट

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 2:02AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी 

पालिकेतील लेखा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी  शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास रंगेहाथ अटक केली आहे; मात्र उंदराची शिकार करताना खरा बोका मुख्य लेखापाल राजेश लांडे मोकाट आहेत. उंदराला चौदावे रत्न दाखवा, तो बोक्याचे नाव सांगेल, अशी सणसणीत टीका पालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लेखा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक 
केली आहे. 

प्रकाश जयसिंग रोहकले (वय 39, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या  लिपिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे कंत्राट होते. याच कंत्राटाच्या एक लाख 64 हजार रुपयांच्या बिलाच्या फायलीवर वरिष्ठांची सही घेऊन धनादेश देतो, असे सांगून तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी रोहकलेने केली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.  या विभागाच्या पोलिसांनी पालिकेतील लेखा विभागात सापळा रचून त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

याबाबत आज विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, मुख्य लेखापाल राजेश लांडे खरा बोका आहे. मागील थकीत बिलाचे 159 कोटींचे विषय स्थायी समितीच्या सभेत आणून पठाणी वसुली केली, वर पालिकेच्या ठेवी अल्पमुदतीने ठेवून महापालिकेचा फायदा करून दिल्याचा दिंडोरा पिटला. लेखा विभागास पैसे घेण्याची सवय लागली आहे. रोज कितीतरी फायली ‘इन वर्ड’ होत असतात, त्यामुळे मोठा भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप बहल यांनी केला.भाजपच्या काळात पालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. लांडे यांच्यासारखे अधिकारी त्यांना एकदम टेंडर आणि त्यात ‘रिंग’साठी मदत करत आहेत, असा आरोप बहल यांनी केला.राजेश लांडे यांना पालिका कर्मचारी महासंघाचा विरोध होता. पालिकेतील अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याची मागणी होत होती; मात्र पालिकेतील राज्यकर्त्यांच्या आश्रयामुळे लांडे सुसाट सुटले आहेत, अशी टीका योगेश बहल यांनी केली