Thu, Jul 18, 2019 12:59होमपेज › Pune › 425 कोटींवरून विरोधकांनी भाजपाला घेरले

425 कोटींवरून विरोधकांनी भाजपाला घेरले

Published On: Feb 06 2018 2:09AM | Last Updated: Feb 06 2018 2:08AMपिंपरी : प्रतिनिधी 

रस्ते विकासाच्या 425 कोटींच्या कामांमध्ये ‘रिंग’ करून, सुमारे 90 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करीत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला सभागृहात चारी बाजूने घेरले. विविध विषयांना जोडून हा मुद्दा सतत उपस्थित होत असल्याने, हैराण झालेल्या भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांनी समाविष्ट गावांतील कामांमुळे विरोधकांचा तीळपापड झाल्याची टीका करीत खुलासा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मागील राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढत 425 कोटींमध्ये जादा दराने निविदा नसल्याचा दावा भाजपाने केला.  महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.5) झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. सभेत विरोधकांनी 425 कोटींच्या निविदा प्रकरणातील गैरव्यवहारावर सत्ताधार्‍यांना घेरले. राष्ट्रवादीचे दत्ता साने म्हणाले की, समाविष्ट गावांत 425 कोटींचे रस्त्यांची  कामे करणार म्हणून भाजपाने फ्लेक्स लावत आनंदोत्सव साजरा केला.

नियमानुसार 80 टक्के जागा ताब्यात नसताना निविदा काढली. टीडीआर आणि एफएसआय नसताना या ठिकाणी भरभसाट खर्च करण्याची घाई का केली गेली? त्यात घोळ झाला आहे. सत्ताधार्‍यांना इतके ‘टेन्शन’ का आले आहे? त्यावर महापौर काळजे म्हणाले की, चर्‍होलीतील 7 पैकी केवळ एकच जागेचा ताबा येणे बाकी आहे. शेतकरी स्वत:हून जागेचा ताबा देत आहेत. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी विविध कामांतील ‘रिंग’प्रकरणी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीचा मुद्दा मांडला. तक्रारीवर आयुक्तांनी मोघम उत्तरे देऊन सत्ताधार्‍यांची ‘वकिली’ करीत असल्याच्या आरोपाचा पुनर्उच्चार केला. 425 कोटींच्या कामात पूर्वी कमी दराने कामे करणार्‍या 12 ठेकेदारांची जादा दराने निविदा मंजूर केली आहे. त्यामुळे टक्केवारीसोबत भ्रष्टाचार वाढला आहे. आयुक्तांसह सर्वच अधिकार्‍यांनी कोणताही शेरा न मारता फायलींवर तत्परतेने सह्या केल्या. कामास विरोध नसून, वाईट पद्धतीने होणार्‍या कामास राष्ट्रवादीचा विरोध आहे. सत्ताधार्‍यांनी ‘काम’च दाखविले आहे. 

तत्कालीन आयुक्त राजीव जाधव हे कमी दरात काम करू शकतात, तर श्रावण हर्डीकरांना हे काम जमत नाही. मुख्य लेखापाल राजेश लांडे हे ‘बोका’ असून, टक्केवारी वाढावी म्हणून ठेकेदारांच्या फायली 5-5 वेळा फिरत आहेत, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी तक्रार केल्याने वाकड सीमाभिंतीतील सर्व निविदा उघडून 42 लाखांची बचत झाली. तशी भूमिका या निविदेमध्ये आयुक्तांनी घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.  राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले की, 425 कोटींच्या निविदा पारदर्शक नाहीत. त्याची खोलात जाऊन चौकशी करावी. जादा दराने निविदा असल्यास त्या कमी कराव्यात. पालिकेचे आर्थिक नुकसान थांबवावे. 

यावर खुलासा करताना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीच्या मागील काळातील अनेक निविदा 30 ते 70 टक्के जादा दराने दिल्या गेल्याचा आरोप केले. राष्ट्रवादीच्या स्थायी समिती अध्यक्ष उषा वाघेरे, प्रशांत शितोळे, अजित गव्हाणे यांच्या  कार्यकाळात मंजुरी दिलेल्या कामांची यादीच सभागृहासमोर त्यांनी मांडली. 425 कोटींच्या कामांची पुराव्यासह तक्रार करावी; अन्यथा राजकारण सोडावे, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. राज्यात व महापालिकेत शिवसेना राष्ट्रवादीसोबत वेगवेगळ्या भूमिकेत वावरत असल्याची टीका त्यांनी राहुल कलाटे यांच्यावर केली. शिवसेना व राष्ट्रवादीच्या ‘रिंग’वर त्यांनी शंका  उपस्थित केली. 

नगरसेविका सारिका बोर्‍हाडे म्हणाल्या की, समाविष्ट गावांना 20 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. त्यामुळे काही जणांच्या पोटात दुखत आहे. आता आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत, त्याचे विरोधकांना दु:ख वाटत आहे. भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करणार्‍या खासदारांनी गेल्या 15 वर्षांत समाविष्ट गावांसाठी काय काम केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विकासकामांचे राजकारण करू नका, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले. गेल्या 35 वर्षांपासून समाविष्ट गावे विकासापासून वंचित ठेवली. समाविष्ट गावांत भाजपा विकासकामे करत असल्याने विरोधकांचा तीळपापड होऊ लागला आहे. त्यामुळे विरोधक भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करत आहेत. त्यांच्याकडे याबाबतचा एकही पुरावा नाही. केवळ आरोप करून विकासकामात राजकारण करत आहेत. समाविष्ट गावांसाठी 15 वर्षे खासदार असलेल्यांनी काय काम केले ते सांगावे. उगाच आरोप करू नयेत, असा मुद्दा समाविष्ट गावांतील भाजपाचे  नगरसेवक राहुल जाधव, कुंदन गायकवाड, सारिका बोर्‍हाडे, अश्‍विनी जाधव, सुवर्णा बुर्डे यांनी उपस्थित केला.