Tue, Aug 20, 2019 05:17होमपेज › Pune › टेम्पाची धडक बसून दोघांचा मृत्यू

टेम्पाची धडक बसून दोघांचा मृत्यू

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:11AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

टेम्पो ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये सातारा आणि सांगली येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात हिंजवडी येथील माणगावाजवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला. टेम्पो ट्रॅव्हल्स चालक फरार झाला आहे. मंगेश मुरलीधर कणसे (25, रा. पिरंगुड, मूळ रा, लिंबाचीवाडी सातारा) संभाजी बिराप्पा गराळे (25, रा. माणगाव, मूळ गाव संन्याळ, ता. जत, सांगली) या दोघांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश आणि संभाजी हे दोघे पिरंगुट येथील एका कंपनीमध्ये कामाला होते. मंगेश हा पिरंगुट येथे, तर संभाजी हा माणगाव येथे राहत होता. सोमवारी पहाटे हे दोघे मंगेशच्या दुचाकीवरून माणगावातून घोेटवडेच्या दिशेने निघाले होते. माणगावातून अवघ्या 100 मीटर पुढे गेल्यानंतर समोरून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची दुचाकीला धडक बसली. मंगेश आणि संभाजी हे दोघे रस्त्यावर फेकले गेले, तर 

दुचाकी ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली सापडली. हा अपघात एवढा प्रचंड होता की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. पहाटे सहा वाजता हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. तत्काळ हिंजवडी पोलिस घटनास्थळी पोचले. रस्त्यावर पडलेल्या दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मृतदेह शबविच्छेदन करण्यासाठी औंध जिल्हा रुग्नालयात हलवण्यात आले. एका तरुणाच्या खिशात ओळखपत्र सापडल्याने ओळख पटवता आली. टेम्पो ट्रॅव्हल्स चालक अपघातानंतर गाडी सोडून फरार झाला आहे. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.