होमपेज › Pune › पालिका भवनाशेजारी मेट्रोचे पिंपरी स्टेशन

पालिका भवनाशेजारी मेट्रोचे पिंपरी स्टेशन

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:28AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाशेजारी पुणे मेट्रोचे स्टेशन उभारले जाणार आहे. पालिका भवन इमारत, मोरवाडी चौक, फिनोलेक्स कंपनी आणि कमला क्रॉस बिल्डिंग असे चार ठिकाणाच्या इन व आऊट गेटमधून प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. शहरात मेट्रोची मार्गिका उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 163 फाउंडेशन पूर्ण झाले आहेत. तर 117 पिलर उभे राहिले आहेत. सेगमेंटची जुळणी 14 स्पॅनमध्ये पूर्ण झाली आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पालिका भवन येथील मेट्रोचे स्थानक कसे असेल, याची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे. 

मेट्रो स्टेशन पालिका भवनाच्या ‘इन गेट’शेजारील खासगी जागेत उभारले जाणार आहे. तसेच, या ठिकाणी वाहनतळाचीही सोय असणार आहे. मेट्रो प्रवाशांसाठी 4 ठिकाणाहून स्टेशनला ये-जा करता येणार आहे. पालिका भवन इमारत, मोरवाडी चौकातील अहल्यादेवी होळकर पुतळा आणि पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या पलिकडील बाजूच्या फिनोलेक्स कंपनी आणि कमला क्रॉस बिल्डींगचा पदपथ येथे प्रवाशांना स्टेशनवर ये-जा करण्यासाठी नियमित जीने व सरकते जिने असणार आहेत. 

स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर मेट्रोसह सर्व प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज- एफओबी) असणार आहे. त्यामुळे पादचार्‍यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे. तर, दुसर्‍या मजल्यावर मेट्रोचे स्टेशन असेल. स्टेशनमध्ये तिकीट काढल्यानंतरच तेथे प्रवेश मिळणार आहे. संपूर्ण स्टेशन वातानुकुलीत असणार आहे. तसेच, त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. स्टेशनची जागा मेट्रोस देण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. लवकरच कामास सुरूवात केली जाणार आहे. हे स्टेशन ‘कॉर्पोरेट लुक’ प्रमाणे भासणार आहे. त्यासाठी विशिष्टपूर्ण डिजाईन केले गेले आहे. या स्टेशनमुळे पालिका भवनाच्या वैभवात भर पडणार असल्याचा दावा मेट्रोने केला आहे. तसेच, हॉटेल सिट्रसशेजारी आणि इंदिरा गांधी उड्डाणपुलाशेजारी अद्ययावत वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे सुलभ होणार आहे, असे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण स्टेशन

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरून मेट्रो मार्गिक जाणार आहे. भवनाच्या ‘इन गेट’ शेजारी पिंपरी स्टेशन निर्माण केले जाणार आहे. पालिकेच्या सौंदर्यात भर घालणारे हे विशिष्टयपूर्ण असे स्टेशन असणार आहे. रस्त्यांच्या चारी बाजूने नागरिकांना स्टेशनवर ये-जा करण्याची सोय असणार आहे. सरकत्या जिन्यामुळे त्याचा लाभ कोणालाही सुलभपणे घेता येणार आहे, असे मेट्रोच्या रिच वन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.