Tue, Jul 23, 2019 02:25होमपेज › Pune › ‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू

‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 1:03AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पुणेे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात  पिंपरी ते हॅरिस ब्रीजदरम्यान 216 वृक्ष बाधित होत असून त्यापैकी  81 वृक्ष काढावे लागणार आहेत तर 135 वृक्षांचे महामेट्रोकडून आधुनिक पद्धतीने पुनर्रोपण करण्यात येत असल्याची माहिती फलोत्पादन विभागाचे उपमहाव्यवस्थापक बी. जी. माने यांनी  दिली. मेट्रोच्या कामामध्ये काही वृक्षांचा अडथळा होत आहे. या वृक्षांचा एक्सपर्ट कमिटीमार्फत सर्व्हे करण्यात येतो. असा सर्व्हे पिंपरी ते  हॅरिस ब्रिज दरम्यानच्या वृक्षांचा करण्यात आला आहे. त्यामध्ये 216 झाडे बाधित होत आहेत. त्यापैकी 135 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे निश्‍चित झाले आहे. पुनर्रोपणचे काम अधिक चांगल्या प्रकारे व्हावे, म्हणून महामेट्रोने दोन प्रकारचे 

पुनर्रोपणाचे प्रात्यक्षिक घेतले. त्यामध्ये सर्वसाधारणपणे केले जाणारे पुनर्रोपण आणि जागतिक धर्तीवर मान्य केलेले वृक्षाचे  पुनर्रोपण या दोन्ही प्रकारच्या  पुनर्रोपणचे  काम नाशिक फाटा ते खराळवाडी दरम्यान चालू आहे. पुणे मेट्रोच्या बांधकामामधील जास्तीत जास्त झाडे वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे पुणे शहराच्या  हरितीकरणामध्ये अडथळा येऊ नये, म्हणून तोडल्या जाणार्‍या झाडांच्या बदल्यात प्रतिवृक्ष दहा झाडे लावली जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर व पुणे महानगर परिसराच्या हद्दीमध्ये प्रत्येकी 3 हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

पुणे महापालिकेमध्ये वन विभागाच्या पाचगाव पर्वती वनविहार (तळजाई) या ठिकाणी वन विभागाने वृक्षलागवडीसाठी 10 एकर क्षेत्रसाठी  परवानगी दिली आहे. आतापर्यंत दोन हजार स्थानिक  प्रजातींची वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. उर्वरित िउद्दष्ट्येही डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये दिघी येथील संरक्षण विभागाने वृक्षलागवडीसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. आकुर्डी येथे उपलब्ध जागेत 125 झाडे लावण्यात आली आहेत. या जागेमध्ये योजनाबद्ध उपवन विकसित करण्याची प्रक्रिया चालू आहे. याअंतर्गत एकूण 600 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. मेट्रो लाईनमध्ये सुमारे 3 ते 4 वर्षाची 200 झाडे असून त्यापैकी अडथळा ठरणार्‍या 60 वृक्षांचे पुनर्रोपण पिंपरी येथील गुलाब पुष्पवाटिका येथे करण्यात आले आहे. त्या वृक्षांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे.